Private Advt

हतनुर धरणातून सायंकाळी ४ लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग होणार

रावेर, मुक्ताईनगर तालुक्यातील गावांना प्रशासानकडून अलर्टचा इशारा

जळगाव – हतनुर प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पुर्णा नदीस मोठया प्रमाणात पूर आल्याने व परिसरात मोठया प्रमाणात अतिवृष्टी झालेली असल्याने हतनुर धरणाचे ४१ दरवाजे पुर्णपणे उघडण्यात आलेले आहेत. पुर्णा नदीतुन अंदाजीत सुमारे ४ लक्ष क्युसेस पाण्याचा विसर्ग आज सायंकाळी ७.०० ते रात्री ९.०० वाजेच्या दरम्यान सोडण्यात येणार असलेबाबत कार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे. त्यामुळे हतनुर धरणाखालील नदीकाठच्या सर्व गावांनी सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.
नदीकाठच्या गावातील गावकर्‍यांनी नदीपात्राकडे जाऊ नये. तसेच आपली गुरे ढोरे नदी पात्रात जाणार नाही, तसेच नदीपात्रावरील व नदीपात्रालगतची आपली शेती उपयोगी साहित्य, पशुधन सुरक्षित राहील याची दक्षता घ्यावी. हतनुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील रावेर व मुक्ताईनगर तालुक्यातील नदीकाठच्या गावातील नागरीकांनी विशेष दक्षता व खबरदारी घेणे आवश्यक आहे. धरणातील बॅकवॉटरमुळे नदीकाठच्या गावाचे सखल भागात पाणी शिरण्याची शक्यता असल्याने नदीकाठावरील आपली गुरे ढोरे नदी पात्रात जाणार नाही, तसेच नदीपात्रावरील व नदीपात्रालगतची आपली शेती उपयोगी साहित्य, पशुधन सुरक्षित राहील याची दक्षता घ्यावी. नदी पात्रालगत व नदीपात्रात असलेली अतिक्रमणे त्वरीत हटविणेत यावी. संबंधित सर्व तहसिलदार व गटविकास अधिकारी यांनी याबाबत दक्षता घेणेकामी तात्काळ नदीकाठच्या सर्व गावांमध्ये दवंडी देण्याची व्यवस्था करावी. संभाव्य जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहुन दक्षता घ्यावी. कुठलीही आपत्ती लक्षात आल्यास त्वरीत तालुकास्तरावरील नियंत्रण कक्ष व जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षातील टोल फ्री क्रमांक १०७७ तसेच दुरध्वनी क्र.०२५७-२२१७१९३ या क्रमांवर संपर्क साधावा अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी दिल्या आहे.