हटविलेल्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अनौपचारिक बैठक

0

बंगळूर : लोढा समितीच्या शिफारशी लागू करणे बंधनकारक झाल्यानंतर ‘बीसीसीआय’चे जे पदाधिकारी गोत्यात आले आहेत, त्याची एक अनौपचारिक बैठक बंगळूरमध्ये झाली. एन. श्रीनिवासन, अनुराग ठाकूर या ‘माजी’ अध्यक्षांसह 24 राज्य संघटनांचे पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते. न्यायालयाच्या आदेशानंतर पुढे काय करायचे; याविषयी बैठकीत चर्चा झाल्याचे वृत्त आहे.

श्रीनिवास यांचे नियोजन
या आदेशानंतर पद सोडावे लागणार असल्याने ‘बीसीसीआय’ किंवा राज्य संघटनांच्या बहुतेक अधिकार्‍यांना श्रीनिवासन यांनी आमंत्रित केले होते. अजय शिर्के, राजीव शुक्ला, अनिरुद्ध चौधरी, अमिताभ चौधरी आणि निरंजन शहा हे प्रमुख माजी पदाधिकारीदेखील उपस्थित होते, असे वृत्त आहे. दिल्ली, विदर्भ, मध्य प्रदेश, क्रिकेट क्लब ऑफ इंडिया, रेल्वे या संघटनांचे पदाधिकारी मात्र गैरहजर होते. ‘न्यायालयाच्या आदेशानंतरही आम्ही एकत्र आहोत, हे दाखवून देण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पुढे काय करायचे; यासंदर्भात प्रत्येकाने आपले मत मांडल्याची माहिती बैठकीस उपस्थित असलेल्या एका पदाधिकार्‍याने दिली.

भूमिका मांडणार
19 जानेवारी न्यायालयातर्फे ‘बीसीसीआय’चे कामकाज ठरवण्यासाठी एका प्रशासकीय पॅनलची नियुक्ती करण्यात येणार असून त्यानंतरच गोत्यात आलेले अधिकारी आपली ठोस भूमिका जाहीर करतील. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानंतर लोढा समितीची पहिली बैठक 11 जानेवारी रोजी होण्याची शक्यता आहे. आम्ही आता पुढे काय करायचे अशी विचारणा 18 राज्य संघटनांकडून लोढा समितीला करण्यात आली आहे.