हंबर्डीकर चौक रस्ता काँक्रिटीकरणासाठी महिनाभर बंद

Humbardikar Chowk road in Bhusawal closed for a month for concreting भुसावळ : शहरातील गजबजलेल्या व वर्दळीच्या हंबर्डीकरण चौकापासून ते रेल्वे लोखंडी पुलाच्या रस्ता काँक्रिटीकरण कामाला मंगळवार, 16 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजेपासून सुरूवात करण्यात आली. कामामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने हजोरा वाहनधारकांना आता गवळीवाडामार्गे पांडुरंग टॉकीजकडे जाता येणार आहे. विशेष म्हणजे गवळीवाडा भागात रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करण्यात आल्याने अपघाताची शक्यता असून वेळीच याबाबत उपाययोजना करण्याची अपेक्षा आहे.

36 दिवस मार्ग राहणार बंद
पालिकेने सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतंर्गत श्री संत गाडगेबाबा रुग्णालय ते लोखंडी पुल या मार्गावरील हंबर्डीकर चौक ते लोखंडी पुलापर्यंतच्या रस्ता काँक्रिटीकरण कामाला मंगळवारी सुरवात केल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. शहरातील रेल्वे रुळांमुळे दोन भाग झालेल्या शहराला जोडण्यासाठी हा सर्वांत अधिक वापराचा व महत्वाचा मार्ग पूढील किमान 36 दिवस आता बंद राहणार असल्याने व्यापारीवर्गाचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे तर वाहनधारकांची प्रचंड गैरसोय होणार आहे. वाहनधारकांना आता गवळी वाडा, मामाजी टॉकीज रोडवरुन पांडुरंग टॉकीजकडे जावे लागणार आहे. साततारे ब्रीजला जळगाव व जामनेररोडला वाहतूकीसाठी गवळीवाडा व मामाजी टॉकीज या दोन मार्गांवरुन जाता येणार असून या ठिकाणी एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. यातील गवळीवाडा हा अरुंद मार्ग असून यावल, रावरे, फैजपूरकडून येणारी वाहने या मार्गाने जातील. या मार्गावरील अडथळे मंगळवारी पोलिसांनी दूर केले. जामनेररोडकडून जळगावरोडवर येणारी वाहने मामाजी टॉकीज मार्गावरुन येणार आहेत. या मार्गावरही रस्त्यावर अतिक्रमणे व अडथळे पोलिसांनी दूर केले.

व्यापार्‍यांना सर्वाधिक मोठा फटका
रस्ता कामामुळे हंबर्डीकडे चौकातील सुमारे पन्नासवर दुकानदारांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. या भागात आता ग्राहकांना पायी येण्यासाठीदेखील बंदी घालण्यात आल्याने व्यवसायावर संकट कोसळल्याची भावना व्यापार्‍यांनी व्यक्त केली. आगामी गणेशोत्सव, दिवाळी सणामुळे ग्राहकांनी मालाचा साठा केला होता मात्र आता मार्गच बंद राहणार असल्याने व्यवसायात नुकसान येणार आहे. किमान एकतर्फी वाहतूक सुरू करता आली असती, अशी भावनाही व्यक्त करण्यात आली.