स्व. गोपीनाथ मुंडे तारीख नव्हे तर इतिहास बदलणारे नेते!

0

बीड । दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी शरद पवारांचे राजकीय वलय पाहून 12 डिसेंबरला आपला वाढदिवस केला, असा गौप्यस्फोट करणार्‍या अजित पवारांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र सोडलेे. गोपीनाथ मुंडे हे तारीख नव्हे तर इतिहास बदलणारे नेते आहेत, असे फडणवीस यांनी अजित पवार यांना सुनावले. शनिवारी बीडमध्ये फडणवीस यांनी पवारांच्या विधानाचा समाचार घेतला. गोपीनाथ मुंडे यांचा अपमान सहन करणार नाही. सध्या राजकारण खालच्या पातळीवर गेल्याची खंतही त्यांनी भाषणातून व्यक्त केली.

कमळ नाही तर नुसता मळ : उद्धव ठाकरे

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी वडाळ्यामध्ये सभा घेतली. हुतात्मा स्मारकावर भाजप उमेदवारांनी घेतलेली पारदर्शकतेची शपथ म्हणजे नौटंकी असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. भाजपच्या सभेत होणारी गर्दीही पारदर्शक असल्याचा चिमटा काढत उद्धव ठाकरेंनी भाजपच्या सभांना मिळणा-या कमी प्रतिसादाची खिल्ली उडवली. भाजपकडे कमळ नाही तर नुसता मळ आहे, तर शिवसेनेकडे काम करण्याची तळमळ आहे असे ते म्हणाले. युतीमुळे शिवसेना सडली, अन्यथा आज शिवसेनेचा मुख्यमंत्री असला असता असेही उद्धव ठाकरे म्हणाले. खोटे बोलणारे मुख्यमंत्री राज्याला लाभावे हा शिवरायांचा अपमान आहे असाही आरोप त्यांनी केला.

काय आहे वाद…

काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या वाढदिवसावर वादग्रस्त विधान केले होते. शरद पवार यांचे वलय बघूनच दिवंगत मुंडे यांनी 1980 च्या दरम्यान आपला वाढदिवस पवारांच्या वाढदिवसाच्या दिवशीच 12 डिसेंबरला साजरा करणे सुरू केल्याचे धनंजय मुंडे यांनी मला सांगितले असे अजित पवार यांनी जाहीरपणे सांगितले होते. तर भाजप अंतर्गत मतभेदानंतर दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता. मुलगी पंकजा, पाशा पटेल, माधुरी मिसाळ, प्रकाश शेंडगे असे चार-पाच आमदारही पक्ष सोडणार होते. पण अशा प्रकारे पक्ष फोडायचा नसतो, असे मत व्यक्त करत तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीच त्यांना पक्षात घेतले नाही, असा गौप्यस्फोटही पवारांनी केला होता. या विधानावरुन मुंडे समर्थक आक्रमक झाले आहेत.