स्वीकृत सदस्य निवडीला शे.कुर्बान यांची हरकत

0

फैजपूर । कॉंग्रेस व अपक्ष नगरसेवक मिळून स्थापन केलेल्या 7 नगरसेवकांच्या गटांच्या वतीने स्वीकृत नगरसेवकपदासाठी डॉ.शेख इम्रान अब्दुल रऊफ यांच्या प्रस्तावाला बुधवार 29 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते शे.कुर्बान यांनी लेखी तक्रारीद्वारे हरकत जिल्हाधिकारी यांच्याकडे घेतली. या तक्रारीत 2 बाबी म्हटल्या आहे की, डॉ.शेख इम्रान यांनी सादर केलेली डिग्री ही शंकास्पद असून त्यांची आज रोजी फैजपूर शहरात वैद्यकीय सेवा उपलब्ध नाही. त्यांनी 5 वर्षाचा खोटा अनुभव असल्याचा दाखला सादर केला आहे. त्यांनी प्रस्तावासोबत सादर केलेल्या कागदपत्रांची विद्यापीठातून चौकशी करावी. तसेच बुधवार 29 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 वाजेपर्यंत (तारखेच्या 24 तास आधी) स्वीकृत सदस्यांचे प्रस्ताव दाखल करणे अनिवार्य असतांना सुद्धा डॉ.शे.इम्रान यांनी दुपारी 2.20 वाजता प्रस्ताव सादर केला तो सुद्धा कायद्याच्या वेळेच्या चौकटीत बसत नसल्यामुळे या प्रस्तावास मान्यता देवू नये, अशा दोन वेगवेगळ्या तक्रारी आज गटनेते शे.कुर्बान यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे दाखल केल्या.

दोन वेगवेगळ्या तक्रारीचे निवेदन सादर
फैजपूर न.पा.तील काँगे्रस 3 व अपक्ष 4 नगरसेवक मिळून दाखल केलेल्या गटाला दि.29 रोजी नगरसेवक शे.कुर्बान यांनी आवाहन देत या गटाची नोंदणी रद्द करुन या सातही नगरसेवकांना कलम 3 (5) व अ‍ॅक्ट 1986 व 1987 अन्वये अपात्र करण्यास यावे. कारण कायद्यान्वये पक्षाच्या चिन्हावरती निवडून आलेले सदस्य व अपक्ष नगरसेवक निवडणुकीनंतर एकमेकांच्या गटात शामील होवू शकत नसल्यामुळे वरील कायद्यान्वये या सातही सदस्यांना अपात्र करुन या नोंदणीकृत गटाची मान्यता रद्द करण्यात यावी, अशी याचिका शे.कुर्बान यांनी काल जिल्हाधिकार्‍यांकडे दाखल केली. या गटात काँग्रेसकडून शे.कलीम मन्यार, देवेंद. बेंडाळे, शाहील बी शकील खान व अपक्ष नगरसेविका नयना चंद्रशेखर चौधरी, पुष्पा मनोज कापडे, सायमा बी. मलक आबीद, नफीसा बानो शे इरफान या 7 नगरसेवकांचा या उपर्‍या गटात समावेश आहे.