स्वीकृत नगरसेवकपदासाठी लॉबिंगला ऊत!

0

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील ‘स्वीकृत’च्या पाच नगरसेवकपदाची निवड निर्णायक टप्प्यावर आली आहे. सत्तारूढ भारतीय जनता पक्षाला तीन तर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला दोन जागा मिळणार आहेत. मंगळवारी (दि.9) उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार असल्याने दोन्ही पक्षांतील इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कोणत्याही परिस्थितीत आपल्याच नावावर शिक्कामोर्तब व्हावे, यासाठी इच्छुकांचा आटापिटा सुरू आहे. महापालिका इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरील नगरविकास कार्यालयात मंगळवारी सकाळी 11 वाजता इच्छुकांना अर्ज जमा करावयाचे आहेत. महापालिकेत भाजप 77, राष्ट्रवादी 36, शिवसेना 9, अपक्ष 5 आणि मनसे 1 असे बलाबल आहे. महापालिकेत 128 नगरसेवक निवडून येतात. तर पाच स्वीकृत सदस्यांची निवड होते. 20 मेरोजी होणार्‍या सभेत या नावांवर शिक्कामोर्तब होणार आहे. त्या नावांच्या निश्चितीसाठी नऊ मेरोजी आयुक्त दालनात गटनेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत संबंधित राजकीय पक्षाने पक्षीय बलानुसार नावे सादर करायची आहेत. त्यामुळे त्याच दिवशी स्वीकृत नगरसेवकपदाचे चित्र स्पष्ट होणार आहे. भाजप उमेदवारांचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे घेणार आहेत. तर राष्ट्रवादीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार दोन नावे निश्चित करणार आहेत.

भाजपमध्ये स्वीकृतसाठी प्रचंड गर्दी
भाजपमध्ये स्वीकृतसाठी इच्छुकांची प्रचंड गर्दी आहे. माजी शहराध्यक्ष तथा प्रवक्ते सदाशिव खाडे, संघटन सरचिटणीस माऊली थोरात, प्रदेश सदस्या उमा खापरे, राजू दुर्गे, सारंग कामतेकर, सचिन लांडगे, महिला मोर्चाच्या अध्यक्षा शैला मोळक, प्रमोद निसळ, महेश कुलकर्णी, सरचिटणीस बाबू नायर, अमर मूलचंदाणी, मोरेश्वर शेडगे, राजेश पिल्ले, संतोष ढोरे, गणेश लंगोटे, विजय फुगे, माजी खासदार गजानन बाबर यांचे चिरंजीव सूरज बाबर आणि माजी महापौर आझम पानसरे यांचे चिरंजीव निहाल पानसरे अशी बरीच मोठी यादी चर्चेत आहे. ठरवून तिकीट कापलेल्या सरचिटणीस अमोल थोरात यांनी आपण स्वीकृतसाठी इच्छुक नसल्याचे नेत्यांकडे लेखी पत्राद्वारे कळवले आहे. अनेक नेत्यांचे जवळचे नातेवाईकही इच्छुकांच्या रांगेत आहेत. काही पराभूत उमेदवारांना मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यांच्यापैकी कोणाच्या गळ्यात स्वीकृत सदस्यपदाची माळ पडते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, याबाबत सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांना विचारले असता त्यांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंतिम निर्णय घेणार असल्याचे सांगितले.

अजित पवार दोन दिवसांत निर्णय देणार..
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्तुळातही याच विषयावरून प्रचंड घडामोडी सुरू आहेत. दोन सदस्य नेमके कोण असतील, यावरून तर्कवितर्क आहेत. भाऊसाहेब भोईर, प्रशांत शितोळे, प्रसाद शेट्टी, नीलेश पांढारकर, संजय वाबळे, अतुल शितोळे, नारायण बहिरवाडे, विजय गावडे, उल्हास शेट्टी, जालिंदर शिंदे, तानाजी खाडे अशी अनेकांची नावे चर्चेत आहेत. निवडणुकीत तिकीट दिले आणि पराभूत झाले, अशा नावांचा विचार होईल का असा प्रश्न आहे. अजित पवार दोन दिवसांत या बाबतीत चर्चा करतील, असे पक्षवर्तुळातून सांगण्यात आले. पवार कोणाला संधी देतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

स्वीकृत सदस्यपदासाठी हे करू शकतात अर्ज..
डॉक्टर, निवृत्त प्राध्यापक, मान्यताप्राप्त विद्यापीठाचे अभियांत्रिकी पदवीधारक, महापालिका कामकाजाची माहिती असलेले निवृत्त अधिकारी हे स्वीकृत सदस्यपदासाठी अर्ज करू शकतात. नामनिर्देशन पत्र, उमेदवारांचे संमतीपत्र, नेत्यांचे हमीपत्र, उमेदवाराचे घोषणापत्र, दोनपेक्षा अधिक अपत्य नसल्यासंबंधीचे शपथपत्र, गुन्हेगारी संबंधी व मालमत्तेसंबंधीचे शपथपत्र, मतदार यादीमध्ये नाव असल्याबाबतची साक्षांकित प्रत, वयाच्या पुराव्याची सत्यप्रत आणि 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर पडताळणी पत्र ही कागदपत्रे अर्ज भरताना जमा करावी लागणार आहेत.