स्वा. सावरकरांना भारतरत्न पुरस्कारास विरोध करणाऱ्यांना अंदमानात पाठवा : संजय राऊत

0

मुंबई: सावरकरांना भारतरत्न देण्यास जे विरोध करत आहे, त्यांना अंदमान-निकोबारमध्ये असलेल्या त्याच तुरुंगात पाठवल्यास सावरकरांनी भोगलेल्या यातना त्यांना समजू शकतील. असा टोला राऊत यांनी विरोधकांना लावत नवा वाद ओढवून घेतला आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी खासदार राहुल गांधी यांच्या सावरकरविरोधी वक्तव्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये कटुता आली आहे. त्यात, काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी करीम लाला, इंदिरा गांधी भेटीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेस शिवसेनेवर नाराज झाला आहे.

संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शिवसेनेच्या अडचणींमध्ये भर पडू शकते. महाविकास आघाडीचा सहकारी पक्ष असणाऱ्या काँग्रेसची भूमिका ही पक्षविरोधी आहे. आता संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

विधासभा निवडणुकीदरम्यान भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने आपल्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात सावरकरांना भारतरत्न देण्याचा मुद्दा नमूद केला आहे. मात्र, पुढे हे दोन पक्ष वेगळे झाले आणि शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या मदतीने सत्ता स्थापन केली. त्यानंतर, सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेस पक्षाचा सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध असल्याने हा मुद्दा संशयाच्या भोवऱ्यात सापडला. याचे कारण म्हणजे सावरकर हे इंग्रजांना माफी पत्र धाडणारा नेता असे वर्णन काँग्रेस पक्ष सतत करत आला आहे. या बरोबरच धर्मनिरपेक्षतेबाबत बोलणाऱ्या काँग्रेस पक्षाला शिवसेनेच्या हिंदुत्वाबाबतही आक्षेप आहे.

Copy