Private Advt

स्वातंत्र्य,समता, बंधुता हे तत्व नागरिकांच्या वर्तन व्यवहाराचा पाया बनला पाहिजे

जळगाव‍ – विधानिक नैतिकता आणि संविधानातील स्वातंत्र्य,समता, बंधुता हे तत्व नागरिकांच्या वर्तन व्यवहाराचा पाया बनला पाहिजे. असे प्रतिपादन प्रभारी कुलगुरू प्रा.ई. वायुनंदन यांनी केले.

            कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या डॉ.आंबेडकर विचारधारा विभागाच्यावतीने संविधान दिनानिमित्त दि.२६ रोजी आयोजित ऑनलाईन विशेष व्याख्यान प्रसंगी अध्यक्षीय समारोप करतांना प्रभारी कुलगुरू प्रा. ई.वायुनंदन बोलत होते.  ते म्हणाले की, भारताचे संविधान हे इतर देशातील संविधानाचे अनुकरण नसुन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक देशांच्या संविधानाचा अभ्यास करून भारतीयांना अनुरूप अशा मानव केंद्रीत संविधानाची निर्मिती करतांना मानवाच्या सर्वकष विकासासाठी जे जे आवश्यक तत्वे आहेत, त्या तत्वांचा अंतर्भाव केला आणि देशाला सर्वश्रेष्ठ संविधान दिले. यावेळी पुणे येथील आंबेडकरवादी अभ्यासक मंगेश दहिवले यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. मंगेश दहिवले यांनी आपल्या व्याख्यानात सांगीतले की, जगात सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताची ओळख आहे. भारतात विविध जाती, धर्म, पंथ, विविध सांस्कृतीचे लोक, विविध भूप्रदेश क्षेत्र विभिन्नता असतानाही या सर्वांना एकत्र व एकात्म करण्याचे कठीणप्राय कार्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून केले आहे. मंगेश घोरपडे ‘पिपल्स रिपब्लिक अॅड पिपल्य कॉन्स्टीट्युशन’ या विषयावर बोलत होते. ते पुढे म्हणाले की, देशाला एकात्म व एकसंघ ठेवण्याचे श्रेय भारतीय संविधानाला जात असले तरी अजूनही अंमलबजावणी आणि व्यक्तीगत आचरणाच्या पातळीवर भारतीय संविधाना बद्दल जनतेत जागरुकता दिसून येत नसल्याची खंत त्यांनी व्यत केली. भारतीय संविधान हाच भारतीयांचा खरा धर्म असल्याचेही त्यांनी सांगीतले. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून सामाजिक शास्त्रे प्रशाळेचे संचालक प्रा.अजय पाटील उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीस समाजकार्य विभागचे डॉ.दिपक सोनवणे यांनी प्रास्ताविकेचे वाचन केले. डॉ. आंबेडकर विचारधारा विभागचे प्रमुख डॉ.अनिल डोंगरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. हर्षल पाटील यांना पाहूण्यांचा परिचय करून दिला. सुत्रसंचालन डॉ.विजय घोरपडे यांनी केले. प्रा.सुबोध वाकोडे यांनी आभार मानले. कार्यक्राच्या शेवटी २६/११ च्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या  वीरांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमास विद्यापीठातील अनेक मान्यवर, सामाजिक शास्त्रे प्रशाळेच्या सर्व विभागातील विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.