स्वागतार्ह पवित्रा

0

उत्तरप्रदेशातल्या लखनऊ शहरातील चकमकीत ठार करण्यात आलेल्या सैफुल्ला या तरूणाच्या ‘इसीस’शी असणार्‍या संबंधांबाबत अद्याप पूर्णपणे प्रकाश पडला नसून याबाबत सखोल तपास सुरू आहे. तथापि त्याचे वडील सरताज यांनी दहशतवादाचा आरोप झालेल्या आपल्या मुलाचे शव स्वीकारण्यास दिलेला नकार आणि या पाठोपाठ गुप्तचर यंत्रणांनी अटक केलेल्या मोहमद गौर खान या व्यक्तीच्या मुलानेही घेतलेला पवित्रा हा अत्यंत आश्‍वासक असाच आहे.

उत्तरप्रदेशातल्या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान तोंडावर असतांना लखनऊमधील चकमकीने देशभरात खळबळ उडाली. या शहरातल्या भर वस्तीत असणार्‍या एका घरात दडून बसलेल्या दहशतवाद्यासोबत ‘एटीएस’ची चकमक सुरू झाल्याचे वृत्त येताच सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्मित होणे स्वाभाविक होते. विशेष म्हणजे मंगळवारी भोपाळ-उज्जैन या पॅसेंजर गाडीत झालेल्या स्फोटाशी याचा संबंध असल्याचे सांगण्यात आले. ही चकमक सुरू असतांना संबंधीत दहशतवादी हा मध्य-पूर्वेतल्या कुख्यात ‘इसीस’ म्हणजेच ‘इस्लामीक स्टेट’ या संघटनेशी संबंधीत असल्याची माहितीदेखील समोर आली. अनेक तासांच्या मेहनतीनंतर उत्तरप्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने संबंधीत सैफुल्ला या तरूणाला यमसदनी पाठविण्यात यश मिळवले. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि अन्य शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आले. तथापि चकमक संपत नाही तोच उत्तरप्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक दलजीत चौधरी यांनी सैफुल्लाचे ‘इसीस’शी संबंध असल्याचा कोणताही ठोस पुरावा नसल्याचे सांगून टाकले. तो ‘इसिस’च्या विचारांनी प्रेरित झाला होता हे मात्र त्यांनी नमूद केले. यामुळे अनेकांच्या मनात संशयकल्लोळ निर्माण झाला. मात्र दरम्यानच्या काळात सैफुल्लाचे वडील सरताज यांनी त्याचे शव स्वीकारण्यास नकार दिला. दहशतवादाचा आरोप असणार्‍या देशद्रोही मुलाचे अंत्यसंस्कार आपण करणार नाही अशी त्यांनी ठाम भूमिका घेतली. अगदी त्यांनी आपल्या मृत मुलाचा चेहरादेखील पाहणार नसल्याचे सांगितले. तर दुसरीकडे या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार मोहंमद गौस खान यालाही अटक करण्यात आल्यानंतर त्याचा मुलगा अब्दूल कादीर यानेही हीच भूमिका घेतली. देशाचा शत्रू असणारा माझा बाप हा माझाही शत्रूच असल्याचे सांगत त्याने त्याच्याशी कोणताही संबंध नसल्याचे ठासून सांगितले.

सरताज आणि अब्दूल कादीर यांनी घेतलेल्या भूमिका या अत्यंत आश्‍वासक आणि स्वागतार्ह अशाच आहेत. ‘दहशतवादाला धर्म नसतो…मग सर्व दहशतवादी एकाच धर्माचे कसे ?’ अशी विचारसरणी अलीकडच्या काळात वारंवार मांडण्यात येत आहे. काश्मिर खोर्‍यात अफजल गुरू आणि बुरहान वानी यांच्यासारख्या देशद्रोह्यांचे होणारे उदात्तीकरण आणि याकूब मेमनच्या अंत्ययात्रेला उसळलेला जनसागर या बाबी याच विचारसरणीला पाठबळ देणार्‍या ठरल्या आहेत. या पार्श्‍वभूमिवर सरताज आणि कादीर यांनी जाज्वल्ल्य देशप्रेमाचा विचार मांडला आहे. काश्मिरच्या कथित स्वातंत्र्यासाठी लढा देणारे देशद्रोही हे तेथील फुटिरतावाद्यांसाठी शहीद ठरतात. आणि दहशतवादाच्या मार्गाने भारताला सतावणारे हे मुठभर लोकांसाठी नायक ठरू शकतात. काही तरूण धर्माच्या नावाखाली होणार्‍या ‘ब्रेन वॉशिंग’ला बळी पडू शकतात. मात्र त्यांच्यामुळे संपूर्ण समुदाय हा नेहमी बदनाम होत असतो. त्यांच्या देशप्रेमाकडे सातत्याने संशयाच्या नजरेतून पाहिले जाते. आणि नेमक्या याच बाबीचा लाभ दुसर्‍या बाजूच्या समुदायातील कट्टरपंथी घेत असतात. अलीकडच्या काळात तर धर्मावर आधारित विभाजन झाले असून ‘राष्ट्रप्रेमी’ आणि ‘राष्ट्रद्रोही’ अशी प्रमाणपत्रे वाटणारी झुंडशाही अस्तित्वात आली आहे. यातून भारतीय समाज दुभंगल्याचे चित्र समोर उभे राहिले आहे. या पार्श्‍वभूमिवर दहशतवादाचा आरोप असणार्‍यांचे कुटुंबियच त्यांना स्वीकारत नसल्याची बाब ही आशादायक अशीच मानावी लागणार आहे. कौटुंबिक पातळीवर घेण्यात येणारा हा पवित्रा आता सामुदायीक पातळीवर जाण्याची आवश्यकता आहे. देशाच्या एकोप्याला ते पूरक ठरू शकते. सरताज आणि अब्दुल कादीर यांनी आपल्या वर्तणुकीतून समाजासमोर आदर्श ठेवला असतांना कर्नाटकात मात्र सुहाना सईद या गायिकेने एका ‘रिअ‍ॅलिटी शो’मध्ये भजन गायल्यामुळे तिला कट्टरपंथियांच्या क्षोभाला सामोरे जावे लागत असल्याची बाबही आपण लक्षात घेणे आवश्यक आहे. तिच्यावर सोशल मीडियातून जोरदार टीका करण्यात आली आहे. अर्थात समाजात सैफुल्ला, मोहंमद गौर खान आणि सुहानावर चिखलफेक करणारे ‘ट्रोल’ अस्तित्वात आहेत. तर दुसरीकडे जोडण्याची भाषा करणारे सरताज, अब्दुल आणि सुहाना हेदेखील आहेत. सामाजिक एकोप्यासाठी दुसर्‍या गटाला पाठबळ देण्याची आवश्यकता आहे.

भारतात अलीकडच्या काळात ‘इसीस’चा वाढता प्रभाव चिंतेचे कारण बनला आहे. ही संघटना भारतीय उपखंडात उत्पात घडवून आणू शकते असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी कधीपासूनच दिलेला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘इसीस’ने भारतात पाळेमुळे मजबूत केले असून अनेक तरूण या संघटनेच्या प्रभावाखाली असल्याचे आधीदेखील स्पष्ट झाले आहे. देशातील अनेक तरूण या संघटनेत थेट सहभागी झाल्याचेही निष्पन्न झालेले आहे. या पार्श्‍वभूमिवर अलीकडच्या काळात वाढलेल्या रेल्वे अपघातांमध्ये दहशतवादी संघटनांचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. यातच रेल्वेतील बाँबस्फोटातले आरोपी ही ‘इसीस’पासून प्रेरित असल्याची बाब अतिशय गंभीर अशीच आहे. विशेष बाब म्हणजे हजारो किलोमीटर दूर असणार्‍यांच्या मनात धर्मासाठी बलीदान करण्याची भावना जागृत करत त्यांना हिंसाचारासाठी प्रेरित करण्याचे काम ही संघटना अत्याधुनीक संपर्क यंत्रणांच्या मदतीने करत आहे. त्यांना आळा घालण्यासाठी सर्वंकष कृतीची आवश्यकता आहे. अर्थात सरताज आणि अब्दुल यांच्यासारख्या राष्ट्रवादी नागरिकांमुळे ‘इसीस’च्या प्रभावाचा विपरीत परिणाम होणार नसल्याची आशा बाळगण्यास हरकत नाही.