Private Advt

स्वाइन फ्लूच्या संशयित रुग्णांची संख्या 10 हजार

0

महापालिकेकडून 287 रुग्णांनाच संसर्ग झाल्याचे स्पष्ट

पुणे : शहरात साथीच्या रोगांमध्ये वाढ होत असताना पालिकेच्या आरोग्य विभागाकडे केवळ 287 रुग्णांनाच स्वाइन फ्लूचा संसर्ग झाल्याचे नमूद केले आहे. मात्र, लक्षणे असूनही केवळ टॅमी फ्लूचे उपचार दिलेल्या संशयित रुग्णांची संख्या 10,625 एवढी असल्याने पालिकेची आकडेवारी फसवी असल्याचे दिसून येत आहे.

जुलै महिन्यापासून स्वाइन फ्लूच्या विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. ऊन, पाऊस व गारवा यांसारख्या वातावरणातील बदलामुळे विषाणूंचा संसर्ग वाढण्यास मदत होत आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये 20 जणांचा या संसर्गाने बळी गेला आहे. त्यांपैकी सात रुग्ण पुण्यातील आहेत. जिल्ह्यातही स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढला आहे.

जानेवारी ते 4 ऑक्टोबरपर्यंत पुण्यात 7 लाख 6,571 एवढ्या रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 1 हजार 415 रुग्णांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यातील 287 जणांना लागण झाली; तर 10,625 जणांना लक्षणे असल्याने संशयित म्हणून टॅमी फ्लूचे उपचार देण्यात आले आहेत. हे रुग्ण पॉझिटिव्ह नसले तरी ते संशयित आहेत. एकूण तपासणीपैकी दीड ते दोन टक्के रुग्णांना लागण झाली होती. तर 98.5 टक्के रुग्णांमध्ये स्वाइन फ्लूची लक्षणेच आढळली नाहीत. स्वाइन फ्लूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 287 एवढी आहे. शहरात तापाच्या रुग्णांची संख्या अधिक दिसून येत आहे; मात्र तापासह अन्य लक्षणे दिसणारे 10,625 एवढे रुग्ण संशयित म्हणून ग्राह्य धरण्यात आले आहेत. त्यांना टॅमी फ्लूचे उपचार देण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या सहायक आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे यांनी स्पष्ट केले आहे.

पालिकेकडे लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या असूनही त्याची माहिती देण्यास टाळाटाळ होत असेल तर त्याची खातरजमा केली जाईल. परंतु, 287 रुग्णांनाच लागण झाली आहे. तर 10,625 रुग्णांना लक्षणे असल्याने त्यांना टॅमी फ्लूचे उपचार देण्यात आले आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना सुरू असून, पुन्हा एकदा खासगी डॉक्टरांना बैठक घेऊन त्याबाबत सूचना देण्यात येतील; असे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी स्पष्ट केले आहे.

हेल्पलाइनला संपर्क करावा

सर्दी, ताप, खोकला यासारखी विविध लक्षणे आढळलेल्या रुग्णाने उपचारासाठी महापालिकेच्या नायडू हॉस्पिटलमध्ये संपर्क करावा. त्यासाठी हेल्पलाइन तयार करण्यात आली आहे. हेल्पलाइनसाठी 25506317 या क्रमाकांवर संपर्क साधावा. यावेळी काय काळजी घ्यावी अथवा कोणत्या उपाययोजना करता येईल या संदर्भातील माहिती उपलब्ध होईल, असेही सांगण्यात आले.