स्वस्त धान्य दुकानदार परवानाधारक महासंघाचे आंदोलन

मुक्ताईनगरात खासदारांसह प्रशासनाला निवेदन तर यावल शहरात तहसीलबाहेर आंदोलन : 2 रोजी दिल्लीत आंदोलन

मुक्ताईनगर : राष्ट्रीय खाद्य सुरक्षा योजनेद्वारा सर्व परवानाधारकांना वर्ल्ड फुड प्रोग्राम अंतर्गत 440 रुपये प्रति क्विंटल कमिशन देण्यात यावे किंवा दरमहा 50 हजार रुपये निश्चित मानधन घोषित करावे, केवळ गहू, तांदूळ अंत्योदय कार्डधारकांना साखर खाद्य पदार्थावर एक किलो प्रति क्विटल हॅण्डलिंग लॉस (तूट) देण्यावर सर्व राज्यांनी तात्काळ निर्णय घेण्याबाबत कार्यवाही करावी, सर्व राज्यातील स्वस्त धान्य दुकानांवर गहू, तांदूळ व्यतिरिक्त खाद्यतेल व दाळी दरमहा देण्यात याव्यात, एल.पी.जी. गॅसच्या संदर्भात सर्व जिल्हाधिकारी यांनी आपल्या जिल्ह्यात कंपनीच्या वितरकांकडून सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना त्यांच्या दुकान अंतर्गत रेशन कार्डवर असलेल्या एल.पी.जी.गॅस सिलेंडरची विक्री नोंदणी करण्याची परवानगी देऊन त्यावर निश्चित कमिशन ठरविण्यात यावे यासह अन्य न्याय मागण्यांसाठी यावल स्वस्त धान्य दुकानदार परवानाधारक महासंघातर्फे तहसील कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले तर मुक्ताईनगरात मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. दरम्यान, न्याय मागण्यांसाठी 2 ऑगस्ट रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावरही तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

विविध मागण्यांचे प्रशासनाला निवेदन
तांदूळ सेच गव्हाच्या गोण्या भरतांना ज्यूटच्या बारदानमध्ये भरून देण्याबाबत व प्लास्टिकच्या गोण्या बंद करण्याबाबत केंद्र सरकारने आदेश काढून भारतीय खाद्य निगमला निर्देशीत करावे, कोरोना महामारीमुळे मृत्युमुखी पडलेल्या परवानाधारकांच्या कुटूंबाला ठराविक स्वरुपात मदत देश पातळीवर घोषित करून त्यांना कोरोना योध्दा म्हणून घोषित करण्यात यावे, संपूर्ण देशात ग्रामीण क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानदारांना डायरेक्ट प्राक्रुमेंट एजंट म्हणजे सरकारद्वारा गहू, तांदूळ भरड धान्य खरेदी करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी दोन्ही ठिकाणी करण्यात आली.

मुक्ताईनगरात खासदार व तहसीलदारांना निवेदन
मुक्ताईनगर : वरील सर्व मागण्यांबाबत खासदार रक्षा खडसे व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष प्रशांत (बाळा) भालशंकर, उपाध्यक्ष गोपाळ पाटील, सचिव संजीव पाटील, गोपाळ पाटील, सुभाष चिंचोले, गोपाळ पाटील, अजबराव पाटील, सुरेश भालेराव, लक्ष्मण चौके आदी दुकानदार उपस्थित होते.

यावलमधील आंदोलनात यांचा सहभाग
यावल : शहरातील आंदोलनात यावल तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील बाळकृष्ण नेवे, तालुका उपाध्यक्ष शेख अब्दुल्ला शेख रसूल, सचिव दिलीप प्रल्हाद मोरे, अजय कुचेकर, नितीन माहरकर, शेख तन्वीर मुश्ताक खान, दिलीप नेवे, आशिक खान, अशोक नेवे, आमद तडवी, कपील खान आदींची उपस्थिती होती.