स्वयंरोजगाराला अधिक प्राधान्य द्या!

0

जळगाव । बेरोजगार युवकांनी आपल्याला रोजगारासाठी आवश्यक कौशल्य प्राप्त करावे, त्यानंतर रोजगाराच्या अमर्याद संधी उपलब्ध आहेत. या संधी रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. तथापि बेरोजगार युवकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन स्वयंरोजगाराला प्राधान्य द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी शुक्रवारी 17 मार्च 2017 रोजी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि युवा विकास फाऊंडेशनच्या वतीने सरदार पटेल लेवा भवन येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी निंबाळकर उपस्थित युवकांना मार्गदर्शन करतांना बोलत होते. या रोजगार मेळाव्यातील जिल्ह्यात विविध तालुक्यातील खेड्यापाड्यातील बेरोजगार व सुशिक्षित तरूणांनी या मेळाव्यात उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला.

यांची होती उपस्थिती
यावेळी महानगरपालिका आयुक्त जीवन सोनवणे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, सहाय्यक संचालक कौशल्य विकास केंद्राचे प्रभाकर हरडे, कौशल्य विकास अधिकारी ए. आर. खैरनार, डॉ. स्नेहल फेगडे, युवा विकास फाऊंडेशनचे विष्णू भंगाळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी निंबाळकर यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करुन मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कौशल्य विकास अधिकारी ए.आर. खैरनार यांनी केले. मनपा आयुक्त सोनवणे व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.

उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले मनोगत
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, कौशल्य विकासाची योजना शासन राबवित आहे. त्याचा लाभ घेऊन युवकांनी आपल्यातील कौशल्याचा विकास करुन रोजगाराभिमुख व्हावे. स्वयंरोजगाराची कास धरुन स्वतः उद्योग व्यवसाय उभारावा. त्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी त्यांनी उपस्थित युवकांना केले. या मेळाव्यात 13 नामांकित कंपन्यांनी आपल्या 1247 पदांसाठी युवकांच्या मुलाखती घेतल्या. मेळाव्याचा लाभ घेऊन रोजगाराच्या संधी मिळाली होती. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तुषार वाघुळदे यांनी केले तर आभार माजी महापौर विष्णू भंगाळे यांनी मानले.

या कंपन्यांनी घेतला सहभाग
पासकी जॉब कन्सल्टन्सी जळगाव, टीम प्लस एचआर सर्व्हीस प्रा.लि. जळगाव, कॉजंट सर्व्हीस बडोदा, व्हीडीओकॉन औरंगाबाद, हायर औरंगाबाद, एमडी स्विचगिअर जळगाव, महालक्ष्मी बहुउद्देशिय संस्था रावेर, टाटा स्ट्रीव्ह स्कील डेव्हलोपमेन्ट सेन्टर पुणे, नवकिसान बायो-प्लानटेक लि. जळगाव, युरेका फोर्ब जळगाव, नवभारत फर्टीलायझरर्स औरंगाबाद, स्पेक्ट्रम पॉलीटेक जळगाव, एस.पी. फार्मासीट्यूकल जळगाव, स्टार फेब्रीकेशन लि.जळगाव या कंपनीच्या व्यवस्थापकांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांची मुलाखत घेवून थेट नियुक्तीचे पत्र काही कंपन्यांनी दिले तर काहींना फोन करून बोलावण्यात येणार असल्याची माहिती उपस्थिती असलेल्या मान्यवरांनी दिली. यामुळे मेळाव्यात आलेल्या बेरोजगार विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते.