स्वच्छतेवरुन गाजणार पालिकेची विशेष सभा

0

भुसावळ। स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशभरात करण्यात आलेल्या सर्वेक्षणानंतर दुसर्‍या क्रमांकाचे अस्वच्छ शहर म्हणून जाहीर करण्यात आले. त्यानंतर पालिकेतील विरोधकांच्या हाती यामुळे आयते कोलीत मिळून त्यांनी या मुद्याला धरुन जनभावना चेतविण्याचे काम केले. त्यामुळे पालिकेची विशेष सभा शुक्रवार 12 रोजी बोलविण्यात येऊन यामध्ये स्वच्छतेवर भर देण्यात आला आहे. मात्र विरोधक देखील शहरातील अस्वच्छतेचा मुद्दा उपस्थित करुन अधिक सत्ताधार्‍यांना घेरण्याचा प्रयत्न करणार असल्याचे समजते.

19 विषयांचा समावेश
शहरातील अस्वच्छतेमुळे विरोधी जनाधार पार्टीच्या नगरसेवकांनी महात्मा गांधी पुतळ्याजवळ नगराध्यक्ष व मुख्याधिकार्‍यांच्या प्रतिमांना चपला- बुटांचे हार घातले. शहरात ठिकठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यामुळे सत्ताधार्‍यांनी देखील या मुद्याला गांभिर्याने घेवून शुक्रवार 12 रोजी सकाळी 11 वाजता होणार्‍या विशेष सभेत शहरातील स्वच्छतेच्या मुद्यांवर भर देण्यात आला आहे. यामध्ये एकूण 19 विषय घेण्यात आले असून 14 व्या वित्त आयोगाअंतर्गत कचरा उचलणे आणि गटारींच्या सफाईसाठी एजन्सी नेमणे, घनकचरा प्रक्रिया करणे, गटारींमधील गाळ साफ करणे, नालेसफाई, डंपिंग ग्राऊंडवरील कचर्‍याचे ढिग जेसीबीच्या सहाय्याने लेव्हल करणे, सफाईसाठी आवश्यक यांत्रिक उपकरणे खरेदी करणे, तयार मुतारी व शौचालय खरेदी करणे यासह नाल्यांवरील अतिक्रमण हटविण्याचे मुद्दे घेण्यात आले आहेत. त्यामुळे या सभेत अस्वच्छतेवरुन विरोधक आक्रमण होऊन हि सभा वादळी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.