स्वच्छता फलकाबाबत मोदींची मिश्कीली

0

वाराणसी – पंतप्रधानपदावर आरूढ झाल्याबरोबर नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेचा नारा देऊन भारताला स्वच्छ करण्याची मोहिमही हाती घेतली असून ती आजतागायत सुरू आहे. ही स्वच्छता मोहिम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावी ते सतत प्रयत्नरत असतात. त्यासाठी पंतप्रधानांनी अभिनेता अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांच्या अभिनयाने गाजलेल्या दीवार या सिनेमाचे पोस्टर जे नैनिताल येथे लावण्यात आले होते, ते त्यांनी रिट्विट केले.

नैनितालच्या नगर पालिका परिषदेने हे पोस्टर तयार केले आहे. गावकर्‍यांनी घरात शौचालय बांधावे यासाठी या पोस्टरच्या माध्यमातून भन्नाट जाहिरात केली आहे आणि चौकात लावलेली ही जाहिरात अनेकांचे लक्ष खेचून घेत आहे. अमिताभ बच्चन, शशि कपूर यांच्या दिवार सिनेमातले पोस्टर एका चौकात लावण्यात आले आहे. या पोस्टरवर दीवार चित्रपटातला प्रसिद्ध डॉयलॉग आज मेरे पास बंगला है, गाड़ी है, बैंक बॅलेन्स है, तुम्हारे पास क्या है? मेरे पास माँ है याच संवादाला तोडून मोडून जाहिरात केली आहे. एका बाजूला अमिताभ दुस-या बाजूला शशी कपूर आणि मध्ये निरुपमा रॉय असून दोघंही आपापल्या घरी येण्यासाठी आईला आग्रह करत आहेत पण ज्याच्या घरात शौचालय आहे त्याच्याच घरात मी जाईल, असे त्या मोठ्या पोस्टरवर लिहिले आहे. खाली उघड्यावर शौचालयास जाऊ नका, घरातच शौचालय बनवा, अशी जाहिरात केली आहे. त्यामुळे ही हटके जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ही जाहिरात पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही खूपच आवडली असून त्यांनी देखील आपल्या ट्विटवर अकाउंटवर या जाहिरातीचा फोटो शेअर केला आहे.