स्मार्ट सिटीचे भवितव्य मतदानयंत्रात बंद : आता प्रतीक्षा निकालाची

0

पुणे : राज्यातील पहिली स्मार्ट सिटी म्हणून निवड झालेल्या पुणे महापालिकेसाठी मंगळवारी 53.55 टक्के मतदान झाले. महापालिकेच्या 162 जागांसाठी 1102 उमेदवारांचे भवितव्य मतपेट्यांमध्ये बंद झाले असून, आता सर्वांचे लक्ष गुरुवारी होणार्‍या मतमोजणीकडे लागले आहे. किरकोळ तक्रारी वगळता सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. मतदार यादीतील गोंधळामुळे अनेकांना मतदानापासून वंचित व्हावे लागेल. त्याबद्दल मतदारांनी संताप व्यक्त केला.

यंदा प्रथमच चार सदस्यांचा एक प्रभाग या पद्धतीने महापालिकेची निवडणूक पार पडली. आकाराने आणि लोकसंख्येने विस्तृत झालेल्या प्रभागांमध्ये प्रचार करताना आणि राजकीय समीकरणे जुळवताना सगळ्याच उमेदवारांच्या नाकीनऊ आले. अखेर मंगळवारी मतदान संपल्यावर सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.

मंगळवारी सकाळी साडेसातला मतदानास प्रारंभ जाला. त्यानंतर पहिल्या दोन तासांत 10 टक्के मतदान झाले. दुपारे दीडपर्यंत ही टक्केवारी 30.52 पर्यंत पोचली. मात्र, कडक उन्हामुळे दुपारच्या सत्रात काहीसे मंदगतीने मतदान झाले. दुपारी साडेचारनंतर उन्हाचा तडाखा कमी झाल्याने पुन्हा मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी झाली. त्यामुळे संध्याकाळी साडेपाचला मतदानाची वेळ संपल्यानंतरही अनेक केंद्रांवर मतदारांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्याचे दिसून येत होते.

प्रभाग क्र.15 शनिवार पेठ- सदाशिव पेठमध्ये सर्वाधिक 65.51 टक्के, तर प्रभाग क्र 9, बाणेर, बालेवाडी- पाषणामध्ये सर्वात कमी म्हणजे 40.96 टक्के मतदान झाले. बाणेर- बालेवाडी हा शहरातील स्मार्ट विभाग म्हणून महापालिकेने घोषित केला आहे. त्याच भागात सर्वांत कमी मतदान झाल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 2012 मध्ये पुणे महापालिकेसाठी 53.07 टक्के मतदान झाले होते. यंदा प्रशासनाने हा आकडा वाढण्यासाठी कंबर कसली होती. मात्र, तरीही मतदानाची टक्केवारी वाढली नाही. शहरात मतदानासाठी 9500 बॅलेट युनिटस बसवण्यात आली होती. त्यांपैकी अवघी नऊ बंद पडल्याची माहिती महापालिकेचे निवडणूक अधिकारी सतीश कुलकर्णी यांनी रात्री पत्रकारांशी बोलताना दिली.

उमेदवारांची माहिती मतदानकेंद्रांवर लावण्याचा प्रयोग मात्र अयशवी ठरला. मतदान केंद्राच्या परिसरात सर्व पक्षांच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी टेबल टाकून मतदानपत्रिका (व्होटींग स्लीप) देण्याची सोय केली होती. निवडणूक आयोगाचे हे काम अपयशी ठरल्याने ही राजकीय व्यवस्थाच मतदारांसाठी उपयोगी ठरली. अनेक मतदार या टेबलांभोवती गर्दी करून स्लिपा घेत होते. या टेबलांभोवतीच मतदानाचा अंदाज घेत राजकीय गप्पाही रंगल्या.

भाजपने कार्यकर्त्यांसाठी जेवणाची पाकिटे पाठवली होती. अन्य पक्षांच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवर ही व्यवस्था केली होती. चहा विक्री आणि शीतपेयांच्या स्टॉलवर शहरात ठिकठिकाणी गर्दी होत होती. ज्येष्ठ नागरिकांना मतदानासाठी काही जणांनी विशेष रिक्षांची सोय केली होती. त्याचा लाभ अनेक ज्येष्ठ नागरिकांनी घेतला. तसेच, मतदानासाठी सुटी जाहीर केल्याने दिवसभर शहरातील वाहतूकही मंदावली होती.
केंद्र शोधताना अडचणी

सर्व मतदारांना मतदानपत्रिका (व्होटिंग स्लीप) वेळेत पोचवण्यात प्रशासनास अपयश आले. त्यामुळे अनेक मतदारांना स्वतःच आपले मतदान केंद्र व क्रमांक शोधण्यासाठी वणवण करावी लागली. असे केंद्र शोधणार्या मतदारांना सर्व पक्षांचे कार्यकर्ते मदत करत होते. मात्र, मतदार यादीतील गोंधळाचा फटका अनेक नागरिकांना बसला. त्यातच मतदार यादीत नावच नसल्याने अनेकांना मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहावे लागले. मतदार यादीत आपले नावच नसल्याचे लक्षात आल्याने मतदार तीव्र संताप व्यक्त करत होते.
धनकवडीत सौम्य लाठीचार्ज

भाजप व राष्ट्रवादीच्या धनकवडीतील कार्यकर्त्यांमध्ये गेल्या दोन- तीन दिवसांपासून कुरबुरी सुरू होत्या. त्याचे पर्यवसान मंगळवारी तुंबळ हाणामारीत झाले. त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. तसे, शहरात काही उमेदवार पैसे वाटत असल्याच्या तक्रारीही पोलिसांकडे करण्यात येत होत्या. त्यामुळे पोलिस यंत्रणेवरही ताण येत होता. प्रभाग क्र. 9 मध्ये राष्ट्रवादी व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत मारामारी झाली. तेथेही तणावाची स्थिती होती. महर्षिनगरमध्ये भाजप कार्यकर्ते डेमो मशीन घेऊन फिरताना आढळले. त्यांना ताब्यात घेण्यात आले.