Private Advt

स्मार्टफोनचा अतिवापर : धोक्याची घंटा

आपल्या पृथ्वीवर विविध प्रकारचे पशुपक्षी आढळतात. काही बलाढ्य आहेत. जसे कि सिंह, वाघ, हत्ती. काही आहेत चपळ. जसे कि चित्ता व घोडा. काही उंच आहेत. जसे की जिराफ व उंट तर काही पक्षी आहेत जे आकाशात उंच उंच भरारी घेतात. इतरही विविधतापूर्ण पशुपक्षी आपल्या पृथ्वीवर आहेत. परंतु, आपल्या पृथ्वीवर मागील हजारो वर्षांपासून एकाच प्राण्याचे वर्चस्व व नियंत्रण आहे आणि ते म्हणजे मानवाचे. न तो बलाढ्य आहे हत्तीसारखा, न तो चपळ आहे चित्त्यासारखा आणि न तो आकाशात उडू शकतो गरुडासारखा. मग त्याची पृथ्वीवर एकाधिकारशाही का? कारण एकच, त्याच्याकडे विचार करण्याची क्षमता आहे. अर्थातच, त्याच्याकडे कल्पनाशक्ती आहे.

मानव (human) त्याच्या कल्पनाशक्तीच्या जोरावरच चाकाचा शोध लावू शकला आणि आज तो चित्त्यापेक्षाही जास्त गतीने भ्रमण करू शकतो. माणसाने उडण्याचे स्वप्न बघितले आणि त्याने विमानाचा शोध लावला व आज तो आकाशात उडू शकतो. असे असंख्य शोध मानवाने फक्त आपल्या कल्पकतेच्या जोरावर लावले. परंतु, याच कल्पनाशक्तीला आज हानी पोहचत आहे, स्मार्टफोन्स म्हणजेच मोबाईलच्या अतिवापराने!

पूर्वी आपण एकमेकांशी मोकळा संवाद साधायचो, अंगणात खेळायचो, एकमेकांना गोष्टी सांगायचो, पुस्तके वाचायचो आणि ह्या गोष्टी करत असतांना आपण विचार करायचो. आपल्या डोक्यात गोष्टींमधील व पुस्तकांमधील विविध पात्रे व दृश्ये उभी राहायची आणि यामुळे आपली कल्पनाशक्ती उत्तेजित होत असे. परंतु, अलीकडच्या काळात स्मार्टफोन (smart phone) व इंटरनेटच्या (internet) अतिवापरामुळे आपल्या कल्पनाशक्तीला खूप कमी प्रमाणात उत्तेजना मिळत आहे. आजकाल स्मार्टफोन व त्यांत हाई स्पीड इंटरनेट असणे हे जणू अनिवार्यच झाले आहे. आणि नक्कीच स्मार्टफोनमुळे आपल्या दैनंदिन जीवनातील कठीण कामे सोपी झाली, यात जराशीही शंका नाही. परंतु, सोप्या गोष्टी कठीण झाल्या हेसुद्धा तितकेच खरे आहे.

स्मार्टफोन आणि हे सगळे काही प्रौढ तसेच वयस्क व्यक्तींपर्यंतच मर्यादित राहायला हवे होते. लहान लहान मुलांच्या हाती त्याच येणे, हे खूप दुर्दैवी आहे. मोठमोठ्या संशोधनांमध्ये स्मार्टफोनच्या अतिवापराला व्यसनाचे नाव दिले जाते आणि हीच व्यसन निर्माण करणारी वस्तू आज सर्रासपणे लहान मुलांच्या हाती दिसत आहे. नक्कीच, कोरोना महामारीमुळे ऑनलाईन शिक्षणाशिवाय पर्याय नाही. परंतु, शिक्षणाव्यतिरिक्त लहान मुलं स्मार्टफोनचा किती व कसा वापर करत आहेत, याबद्दल सर्व अनभिज्ञ आहेत.  आपण वेळीच लहान मुलांच्या स्मार्टफोन अतिवापरावर काहीतरी कृती करायला हवी. त्यांना वाचन तसेच मैदानी खेळ खेळण्यासाठी प्रेरणा द्यायला हवी. कदाचित, त्यांना हे सगळं जाचकसुद्धा वाटेल. पण, त्यांच्या जीवनाला चांगले वळण जरूर लागेल.

– सिद्धार्थ विनोदकुमार पगारिया, बस स्टॅण्ड रोड, साक्री, मो. 7588951879