अश्विनचा आदर मात्र त्याच्याविरुद्ध रणनीती तयार

0

मुंबई: अश्विनसारख्या खेळाडूंबद्दल मला आदर आहे. तो नेहमी फलंदाजांचा विचार करून गोलंदाजी करतो. त्यामुळे मी त्याबद्दलची रणनीती तयार केली असल्याचे ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने सांगितले आहे. वॉर्नर म्हणाला, “अश्विनची जी क्षमता, ताकद आहे, ती लक्षात ठेवून मला फलंदाजी करायची आहे. त्याने त्याची तयारी केली असेल, माझीही रणनीती ठरली आहे. आम्हा दोघांमध्ये चांगले द्वंद्व रंगेल”

कर्णधार कोहलीचे देखील केले कौतुक
यावेळी वॉर्नरने कर्णधार कोहलीचे देखील कौतुक केले. वॉर्नर म्हणाला, “कोहली सध्या तुफान फॉर्मात आहे. तो एक उत्तम खेळाडू आहे. तो क्रिकेटच्या सर्व प्रकारात पारंगत आहे. संपूर्ण देशाच्या अपेक्षा तो पूर्णत्वाकडे नेत आहे. विराट हा पट्टीचा खेळाडू असून तो तोडीस तोड उत्तर देतो. ज्यो रुट, स्टीव्ह स्मिथ, फॅब ड्युप्लेसीस आणि विराट कोहली हे असे खेळाडू आहेत, ज्यांच्यावर जबाबदारी आल्यावर त्यांचा खेळ आणखी बहरतो. मोठ्या खेळी करणाऱ्यांमध्ये विराट हे एक उत्तम उदाहरण आहे”. स्लेजिंगचा प्रश्न उपस्थित करण्यात आल्यावर वॉर्नरने स्लेजिंगचा काहीच उपयोग होणार नसल्याचे म्हटले. कोहली विरोधात स्लेजिंगचा काहीच उपयोग होणार नाही, कारण अशा खेळाडूंना परिस्थितीनुसार कशी फलंदाजी करायची हे चांगले अवगत असते. अशावेळी प्रतिस्पर्धी फलंदाज काय विचार करत आहे, हे जाणून घेऊन गोलंदाजी करणे गरजेचे असते. स्लेजिंग म्हणजे प्रतिस्पर्धी संघाचे फक्त लक्ष विचलीत करण्याचा मार्ग आहे. पण त्यातून संघाला उपयोग होतो असे नाही, असे वॉर्नर म्हणाला.