स्पीडब्रेकरमुळे देशात रोज दहा माणसे अपघातात मरतात

0

नवी दिल्ली : रस्त्यांची संख्या, लांबीरुंदी वाढत नसल्याने वाढती वाहनसंख्या अपघाताचे कारण होत असताना, त्यावरचा उपाय म्हणून अनेक गोष्टी केल्या जात असतात. धावत्या वाहनांच्या वेगाला लगाम लावण्यासाठी म्हणूनच जागोजागी स्पीडब्रेकर ही प्रणाली कार्यवाहीत आली. पण अलिकडल्या काळात तेच स्पीडब्रेकर अपघाताचे कारण होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रतिदिन भारतात सरासरी दहा माणसांचा मृत्यू होत असल्याचा निष्कर्ष चिंताजनक आहे. केंद्रीय वाहतुक मंत्रालयाच्याच एका विभागाने ही आकडेवारी संकलीत केलेली आहे.

वाहतुक मंत्रालय प्रवास, वाहतुक व रस्ते संबंधाने अनेक तपशील कायम गोळा करत असते. त्यात अपघातांचाही समावेश आहे. रस्त्यावर किती अपघात होतात व त्याची काय कारणे आहेत, त्याची माहिती सुविधा व सुधारणा करताना उपयुक्त ठरत असते. २०१४ पर्यंत जी माहिती जमा झाली, त्यात स्पीडब्रेकरच्या कारणाने होणार्‍या अपघातांचे प्रमाण वाढल्याचे लक्षात आल्यावर या खात्याने स्पीडब्रेकरच्याच कारणास्तव होणार्‍या अपघातांची वेगळी माहिती जमा करण्याचे काम सुरू केले. त्यातून ही धक्कादायक माहिती पुढे आलेली आहे.

वास्तविक नवी व अतिशय वेगवान वाहने मध्यंतरीच्या काळात वेगाने बाजारात आली. मुक्त अर्थकारणाने अशा अत्याधुनिक वाहनांचा प्रसार वेगाने होत गेला. पण तितक्या गतीने रस्त्यांचे रुंदीकरण वा सुविधा वाढलेल्या नाहीत. त्यामुळेच सुसाट धावणार्‍या वाहनांना लगाम लावण्यासाठी मोक्याच्या जागी स्फीडब्रेकरचा सढळ हस्ते वापर झालेला आहे. पण आता अशाच स्पीडब्रेकरपायी अपघात वाढल्याचे दिसत आहे. वर्दळीच्या भागात वेगवान वाहनांवर निर्बंध वा वर्दळीच्या जागी पादचारी व वाहने यांची सरमिसळ टाळणे, हाच उपाय होऊ शकेल. पण तशा हालचाली होईपर्यंत अपघात होतच रहाणार. कदाचित येत्या काही वर्षात प्रतिदिन या कारणाने मरणार्‍यांची संख्या वाढलेली ऐकू येईल.