`स्पर्श` कुष्ठरोग अभियानाची अंमलबजावणी करावी

0

धुळे : धुळे जिल्ह्यात 30 जानेवारीपासून `स्पर्श` कुष्ठरोग अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेत कुष्ठरोगाविषयी जनजागृती करण्यात येईल. या अभियानाची परिणामकारक अंमलबजावणी करावी, असे निर्देश उपजिल्हाधिकारी पंकज चौबळ यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात या अभियानाच्या जनजागृतीबाबत बैठक नुकतीच झाली. त्यावेळी उपजिल्हाधिकारी श्री. चौबळ बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय शिंदे, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) सहाय्यक संचालक डॉ. एस. पी. पालवे यांच्यासह विविध विभागांचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपजिल्हाधिकारी चौबळ यांनी सांगितले, 30 जानेवारीपासून स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानास सुरवात होईल. यानिमित्त प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर ग्रामसभेचे आयोजन करण्यात येईल. या ग्रामसभेत कुष्ठरोगाविषयी जनजागृती करण्यात येईल. यानिमित्त प्रतिज्ञा सुध्दा घ्यावयाची आहे, असेही त्यांनी नमूद केले. डॉ. पालवे यांनी सांगितले, स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात आले होते. त्यावेळी जिल्ह्यात 310 संशयित रुग्ण आढळून आले होते. या पार्श्वभूमीवर स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाचे नियोजन करण्यात आले आहे. या अभियानाच्या नियोजनासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेळोवेळी बैठका घेण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.