स्पर्धेच्या युगात वर्तमानपत्राचे महत्त्व कायम

0

चोपडा । आज प्रिंट मिडीया व इलेक्ट्रॉनिक मिडीया यांच्यात स्पर्धा आहे. या स्पर्धेच्या युगात देखील प्रिंट मिडीयाचे महत्व समाजात कायम असल्याचे मत माजी आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केले. चोपडा तालुका सामाजिक पत्रकार संघाने आयोजित गोरगरीब विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळाप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, समाजाला दिशा देण्याचे काम आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून पत्रकार नेहमी करीत असतात. आजची पत्रकारीता ही स्पर्धात्मक अशी असून जाहीरातीच्या रूपाने ही स्पर्धा दिसून येत असली तरी प्रिंट मिडीयाला समाजात आज देखील महत्व आहेच. चोपडा तालुका सामाजिक पत्रकार संघटना विविध सामाजिक उपक्रम राबवित असून समाजासाठी हा पत्रकार संघ नवीन पायंडा पाडत असल्याचेही कैलास पाटील यांनी सांगितले. नगरसेवक जीवन चौधरी बोलतांना म्हटले की, लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आज विखुरलेला आहे. पत्रकारांनी विविध संघटना न करता एकत्रितपणे सामाजिक उपक्रम राबविले पाहिजे. आजचा पत्रकार दिन एक आगळा-वेगळ्या पद्धतीने म्हणजेच शैक्षणिक साहित्याचे वाटप, गरीब विद्यार्थ्यांना कपडे वितरण, 600 विद्यार्थ्यांना अन्नदानाने साजरा केला जात असल्याचे मला अभिमानास्पद वाटत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

चोपड्यात मान्यवरांची उपस्थिती
याप्रसंगी व्यासपीठावर माजी शिक्षक आ.दिलीपराव सोनवणे, नगराध्यक्षा मनिषा चौधरी, चोपडा पिपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा नगरसेवक घनशाम अग्रवाल, नगरसेवक जीवनभाऊ चौधरी, डॉ.रवींद्र पाटील, गजेंद्र जयसवाल, दिपाली चौधरी, डॉ.लोकेंद्र महाजन, पो.नि.किसनराव नजन पाटील, ग.स.संचालक मंगेश भोईटे, जिल्हा उपाध्यक्ष रा.यु.कॉ.ललीत बागुल, प्रमोाद बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी दिलीपराव सोनवणे (माजी शिक्षक आमदार), चंद्रहास गुजराथी, नगरसेवक जीवनभाऊ चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले.

वेले येथील अमर संस्था संचलित वृद्धाश्रमात झाला कार्यक्रम
दिपप्रज्वलाने कार्यक्रमाची सुरूवात करून अद्य पत्रकार कै.बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तालुक्यातील वेले येथील अमर संस्था संचलित वृद्धाश्रमात सदरचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कमला नेहरू वस्तीगृहातील 25 मुलींना कपडे वितरण, मॉडर्न गर्ल स्कुलच्या 25 विद्यार्थ्यांना शालेय बॅग, तर 25 विद्यार्थ्यांना कंपासपेटी, 600 विद्यार्थ्यांना अन्नदानाचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास पाटील, सचिव नंदलाल मराठे, सदस्य पी.आर.माळी, तुषार सूर्यवंशी, रफिक मन्यार, डॉ.अय्युब पिंजारी, दिपक मगरे, संजीव सोनवणे, सुनील पाटील आदी पत्रकार उपस्थित होते. सूत्रसंचालन राधेशाम पाटील तर आभार संजीव शिरसाठ यांनी मानले.