स्पर्धा परीक्षेत धरणगावचे पंकज सपकाळे यांचे यश

0

धरणगाव । आईच्या कुशीत खेळत असतांना हरपलेल पितृछत्र…कुटुंबाची आर्थिक स्थिती साधारणच…परिस्थितीचा आव आणायला बराच वाव, परंतु यशाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून जगणार्‍या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे अडथळे रोखू शकत नाही. संघर्ष केला तर यश निश्‍चित मिळते याचे आदर्श उदाहरण चोपडा ग्रामीण पोलीस स्थानकात कार्यरत असलेल्या पंकज सपकाळे या तरुणाने समाजासमोर निर्माण केले आहे. एमपीएससीचा पोलीस उपनिरिक्षक विभागीय स्पर्धा परिक्षा 2016 चा अंतिम निकाल जाहीर झाला. यात खाते अंतर्गत झालेल्या परिक्षेत पंकज सपकाळे यांनी राज्यातून 134वा क्रमांक मिळविलेला आहे.

नोकरी करून अभ्यास
पोलिस कॉन्स्टेबल ते पालीस अधिकारी असा त्यांचा प्रवास आजच्या तरुणाईला प्रेरीत करणारा आहे. नोकरी लागल्यानंतर अनेक जण प्रगतीचे मार्ग किंवा उच्च पदावर जाण्याची इच्छा सोडून देतात. पोलीस खात्यात नोकरी करून स्पर्धा परिक्षांमध्ये यश मिळवणे तसे कठीणच मानले जाते. 24 तासाची ड्युटी करून ज्या ठिकाणी कुटुंबाला वेळ देता येत नाही त्याठिकाणी अभ्यास करणे तर अवघडच. परंतु वेळेचे नियोजन आणि आत्मविश्‍वासाच्या जोरावर पंकज सपकाळे यांनी राज्यात 134 वा क्रमांक पटकाविला. सपकाळे यांच्या आई प्रमिलाबाई सपकाळे या शिक्षिका असून लहान भाऊ अजय सपकाळे हे प्राध्यापक आहेत. एम.ए. (इंग्रजी)ची पदवी मिळाल्यानंतर त्यांनी स्पर्धा परिक्षांचा अभ्यास सुरु केला. परंतु जास्त दिवस बेरोजगार राहणे परवडणारे नव्हते. म्हणून सपकाळे यांनी आधी पोलीस भरतीत यश मिळविले त्यानंतर न थांबता त्यांनी पुन्हा स्पर्धा परिक्षांचा अभ्यास जोमाने सुरु केला आणि अखेर यश मिळविले.