स्थायी समितीची सभा घेण्यास अट्टाहास का?

0

जळगाव– शहरात कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढू लागली आहे. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात जिल्हाधिकार्‍यांनी जमावबंदीचे आदेश लागू केले आहे. तरीही मनपा स्थायी समितीची सभा दि.22 मे रोजी आयोजित केली आहे. शहर रेड झोनमध्ये असताना सभा घेण्याचे प्रयोजन काय? सभेचा अट्टाहास क ा? असा सवाल उपस्थित करत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयुक्तांना निवेदन देवून सभा रद्दची मागणी केली आहे.

प्रभाग क्रमांक 7 मध्ये सर्व्हे नंबर 7486 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान विकसीत करण्यासाठी खर्चास मान्यता देण्यासह तीन विषयासाठी दि.22 रोजी सकाळी 11 वाजता सभापती अ‍ॅड. शुचिता हाडा यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा आयोजित केली आहे. दरम्यान,कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सभा रद्द करावी अशी मागणी होत आहे.

सभा रद्द न झाल्यास आंदोलन
मनपा स्थायी समितीची सभा रद्द करावी या मागणीसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. शिवसेनेतर्फे मनपा विरोधी पक्ष नेते सुनील महाजन, महानगर प्रमुख शरद तायडे तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील,अ‍ॅड.कुणाल पवार,स्वप्नील नेमाडे,गणेश निंबाळकर यांनी निवेदन दिले. स्थायी समितीची सभा रद्द न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

आर्थिक विषयामुळे टक्केवारीचा संशय
शहरात दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. सभापती स्वत: घरातच रहा,सुरक्षित रहा असे आवाहन करीत असताना आता सभा घेण्याचे औचित्य काय?आहे. सभेच्या विषयपत्रिकेत सर्व विषय आर्थिकतेचे असल्यामुळे टक्केवारीचा संशय येत आहे. यासंदर्भात तर भाजपच्याच नगरसेवकांमध्ये चर्चा आहे.
-सुनील महाजन
विरोधी पक्ष नेते,मनपा

 

प्रशासकीय कामकाज थांबवणे योग्य नाही
कोरोना संसर्गाची सुरुवात झाल्यानंतर आपण स्थायी समितीची सभा तहकुब केली होती. प्रशासनाला प्रशासकीय कामकाज चालू ठेवावे लागणार आहे.कामकाज सुरुच आहेत. प्रशासकीय कामकाज थांबवणे योग्य नाही.त्यामुळे सभा आयोजित केली आहे. स्थायी समितीचे केवळ 16 सदस्य आहेत. सभेत सर्व प्रकारची क ाळजी घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
-अ‍ॅड.शुचिता हाडा
सभापती,स्थायी समिती,मनपा