स्थानिक आमदारांनी केली मुख्यमंत्र्यांशी चर्चा

0

जळगाव : गेल्या 16 वर्षापासून विनावेतन काम करणार्‍या प्राध्यापकांची आता वेतनाची आशा पल्लवीत झाली आहे. राज्यातील विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांनी नागपुर अधिवेशन दरम्यान विधानभवनावर मोर्चा काढला होता. यावेळी शिक्षकांच्या मागण्या संदर्भात जिल्ह्यातील आमदार राजु भोळे, शिरीष चौधरी, उन्मेश पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असता त्यांनी शिक्षकांच्या मागणी संदर्भात शासनाची भुमिका सकारात्मक असून मागण्या मान्य करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर शिक्षकांनी मोर्चा मागे घेण्याचा निर्णय घेतला.

मोर्चात 22 हजार 500 शिक्षक सहभागी
उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय विभाग तुकड्या वर्ग यांची अनुदान पात्र यादी घोषीत करुन त्यासंबंधी अनुदानाची 100 टक्के आर्थिक तरतूद करुन शिक्षकांना पगार सुरु करा, उर्वरित मुल्याकन प्रस्तावाचे कामकाज पूर्ण करुन अनुदान पात्र व त्यासंबंधी अनुदानाची 100 टक्के आर्थिक तरतूद करुन जाहिर करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य विनाउनदानित उच्च माध्यमिक कृती समितीने राज्य अध्यक्ष तानाजी नाईक, संतोष वाघ, दीपक कुलकर्णी, अमरसिंग खांडेकर, प्रा. कुंभारे, भाऊसाहेब बोरसे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील 22 हजार 500 शिक्षकांनी मोर्चा काढला होता. शिक्षकांच्या मागणीसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेवेळी जलसंपदामंत्री ना. गिरीश महाजन, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षक आमदार नागो गाणार, भगवान साळुंखे उपस्थित होते.