सोशल मिडीयाचा विधायक वापर व्हावा

0

भुसावळ । आधुनिक काळात जनसंवादाचे प्रभावी माध्यम म्हणून सोशल मिडीयाकडे पाहिले जाते. त्यामुळे याचा सामाजिक सलोखा वाढविण्यासाठी उपयोग व्हावा. माहितीची देवाण-घेवाण आधी वृत्तपत्र, जनसभा या माध्यमातून होत होती. 90 च्या दशकानंतर इलेक्ट्रॉनिक मिडीयाचा उगम झाला. त्यानंतर माहितीची देवाण-घेवाण सुलभ झाली. यामुळे सोशल मिडीया हे प्रभावी माध्यम असल्याचे प्रतिपादन दिव्य मराठीचे संपादक त्र्यंबक कापडे यांनी केले. येथील दादासाहेब देविदास भोळे महाविद्यालयात सोशल मिडीयाद्वारे सामाजिक जनजागृती या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

मदत करण्याची भावना असावी

मंचावर प्राचार्य डॉ. आर.पी. फालक, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश ढाके, प्रा. अनिल सावळे, प्रा. श्रेया चौधरी उपस्थित होत्या. याप्रसंगी प्राचार्य डॉ. फालक म्हणाले की, प्रत्येकाने व्हॉटस्अ‍ॅपचा सदुपयोग करावा यासाठी सकारात्मक विचार ठेवणे गरजेचे आहे. कुठेही अपघात झाल्यास जखमीला दवाखान्यात दाखल करण्याऐवजी त्याचे फोटो चित्रीकरण करुन गृपवर टाकण्याची घाई असते. हा प्रकार सद्भावना शुन्यता दाखविणारा आहे. त्यामुळे अगोदर दुसर्‍याला मदत करण्याची भावना ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. एस.बी. बाविस्कर, आभार प्रा. श्रेया चौधरी यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा. जगदिश चव्हाण, प्रा. रोहित तुरकेले, प्रा. आर.डी. भोळे, प्रा. एस.एस. पाटील, प्रा. शोभा चौधरी, प्रा. माधुरी पाटील, प्रा. संगिता धर्माधिकारी, प्रा. एस.डी. चौधरी आदींनी सहकार्य केले.