सोलापूर महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू

0

पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचनजवळ रस्त्यावर थांबलेल्या वाळूच्या ट्रकला पाठीमागून आलेल्या टँकरने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात टँकरचालक व टँकरमधील एक प्रवासी अशा दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. शनिवारी पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाल.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात अंकुश राजाभाऊ पंडित (वय 14, रा. परभणी) आणि टँकरचालक एकनाथ विश्वनाथ बाचारे (वय 37, रा. परभणी) यांचा जागीच मृत्यू झाला. टॅकरमधील प्रवासी मेघराज नाथाराव हनवटे (वय 36, रा. बीड), राजू विश्वनाथ पंडित (वय 35, रा. परभणी), कांताबाई मरीबा उजगर (वय 45 रा. परभणी), इंदु राजू पंडित (वय 33, परभणी) आणि ट्रकचालक शैहफान दशरथ शेख (वय 23, रा. इंदापूर) हे गंभीर जखमी झाले.

अपघातग्रस्त ट्रक सोलापूरहून पुण्याच्या दिशेने येत होता. उरुळी कांचनजवळ या ट्रकचे चाक पंक्चर झाले. यावेळी ट्रक रस्त्याच्या मधोमध उभा होता. ट्रकचे चाक पंक्चर झाल्याने ट्रकचालक शैहफान शेख आणि त्यांचा भाऊ महेश रस्त्यावर उतरून चाकाची पाहणी करत असताना पाठीमागून आलेल्या भरधाव टँकरने ट्रकला जोरदार धडक दिली. महेश बाजूला झाल्याने त्याला दुखापत झाली नाही. जखमींना तातडीने लोणी काळभोरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.