सोनगीरच्या आदिवासी तरुणीला राजस्थानात विकले

0

धुळे । राजस्थानला पर्यटनासाठी घेऊन जात असल्याचे सांगून सोनगीर परिसरातून एका तरुणीला राजस्थान येथील अमरसागरला अडीच लाखात विकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोनगीर पोलिसांनी अतिशय सावधपणे चौकशी करुन त्या पिडीत मुलीला राजस्थान पोलिसांच्या मदतीने सोनगीर येथे आणले आहे. या प्रकरणी राजस्थान येथील दोघा संशयितासह पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला. सोनगीर परिसरात मुलींना विकणारी टोळी सक्रीय असल्याचा दाट संशय पोलिसांना आहे. त्या दिशेने सोनगीर पोलीस तपास करीत आहे. दरम्यान, सदर युवती ही चार महिन्यांची गर्भवती असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.

बडवाणीची मूळ रहिवासी
सुमारे पाच महिन्यांपूर्वी मूळची बडवाणी येथील असलेली आणि सध्या सोनगीर येथे राहणार्‍या 28 वर्षीय आदिवासी तरुणीला राजस्थान फिरायला घेऊन जात असल्याची बतावणी करुन गोरख माळी, मंगला माळी, भैय्या भिल यांनी नेले. तेथे अमरसागर, जैसलमेर येथील दिनेश माळी याच्या मदतीने हिरा माळी याच्याशी दमबाजी करुन बळजबरीने विवाह लावून दिला. मुलीच्या वडिलांनी याबाबत दोघांना अनेक वेळा मुलीविषयी विचारण केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

पलायन केले : दरम्यान पिडीत तरुणी राजस्थानमधून आपल्या वडिलांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करीत होती. परंतू, तिला प्रत्येक वेळेस अडचणी येत होत्या. अखेर एक दिवस तिचा पती बाहेर गावाला गेल्याची संधी साधून तिने तेथून रात्रीच्या वेळेस पळ काढला. जंगल मार्गे ती जैसलमेर शहरात पोहोचली. तिने तेथील एका पोलीस ठाण्यात धाव घेतली. घडलेला प्रकार कथन केला. यानंतर तेथील पोलिसांनी मोबाईलवरुन तिच्या वडीलांशी संपर्क झाला. पिडीत तरुणीने तिच्या वडिलांना सर्व घटना सांगितली. हिरा माळी याने माझ्याशी बळजबरीने अत्याचार केला. माझा छळ केला. त्याच्यापासून मला गर्भधारणा झाली आहे. हे लोक माझा अतोनात छळ करीत असल्याचेही तिने वडीलांना सांगितले. आपली मुलगी खुप त्रासात असल्याचे लक्षात आल्याने वडिलांनी लागलीच सोनगीर पोलीसांकडे तक्रार केली.

पोलिसांचे पथक रवाना
सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर वारे यांनी पथक तयार केले. हवालदार राजेंद्र पाटील, रवि राजपूत, बेबी पाटील या तिघांनी राजस्थान गाठले. जैसलमेर पोलिसांची मदत घेत हिरा माळीला ताब्यात घेतले. दोघांना सोनगीरला आणले. वारे यांनी चौकशी केली असता गोरख, मंगल माळी व भैय्या भिलचे नाव समोर आले.