सोनगीरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर वारेंची बदली करा – आमदार कुणाल पाटील

0

धुळे- धुळे तालुक्यातील सोनगीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मनमानी कार्यपध्दतीला जनता कंटाळली असून राजकीय हेतूने ग्रामस्थांवर खोटे गुन्हे दाखल करणार्‍या वारे यांची तत्काळ बदली करावी, अशी मागणी काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाष देवरे यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केली आहे. गुरुवारी आमदार कुणाल पाटील यांच्या मार्गदर्शनात शेकडो ग्रामस्थांनी पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे यांची भेट घेवून निवेदन दिले. यावेळी सभापती देवरे यांनी वारे यांच्या कृत्याचा पाढाच वाचला. 31 जानेवारीला ग्रामपंचायतीने बाजार ओटा भूमिपुजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सदर कार्यक्रम संपल्यानंतर बोरीस गावातील उपसरपंच विश्वास पाटील यांना त्याच गावातील गोकुळ पाटील, चंद्रभान पाटील, प्रमोद पाटील, राकेश पाटील, तुकाराम पाटील अशा सात लोकांनी मारहाण केली. या प्रकरणी सोनगीर पोलीसात फिर्याद नोंदविली होती. मात्र वरील सातही व्यक्तींवर कोणत्याही प्रकारची कारवाई न करता सपोनी ज्ञानेश्वर वारे यांनी मारहाणीची चौकशी न करता उपसरपंच विश्वास सीताराम पाटील यांच्याविरुध्द सुरेखा अशोक पाटील यांच्या नावाने खोटी तक्रार घेवून कलम 354 प्रमाणे गुन्हा दाखल केला. त्यामुळे पंचक्रोशीतल ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी आहे. सपोनि वारे यांची तत्काळ बदली करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.