सैराट झालेल्या सरकारचा सर्वत्र झिंगाट कारभार

0

जामनेर । देशासह, राज्यातील सरकार हे संवेदनाहीन असून त्यांना सामान्य तळागाळातील जनतेशी काहीएक देणे घेणे नाही. देशात शेतकर्यांच्या होणार्‍या आत्महत्येत महाराष्ट्र राज्याने उंच्चाक गाठला असून ही आपल्यासाठी शरमेची बाब असून या सरकारला याचे काहीही सोयर-सुतक नाही. राज्यासह केंद्रात या सरकारचा सैराट सारखा झिंगाट कारभार चालू असून हे सरकार फक्त नेम चेंजर असून गेम चेंजर नाही, असा घणाघात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी जामनेर येथे सभेत केला. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री नितीन राऊत, नसीम खान, माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी उपस्थित होते.

भाजप-सेना सरकारला लगावला टोला

आघाडी सरकारच्या कल्याणकारी योजनांचे नावे बदलवून त्याच त्या योजना राबवून गाजावाजा करीत आहे. भाजप सरकारने मागे लोकसभेच्या वेळेस गर्जना केल्या. भाजप ’मंदिर वही बनायेंगे मात्र तारीख नहीं बतायेंगे’ तर शिवसेना म्हणजे राजीनामा हमारे जेब में है, मात्र तारीख नहीं बतायेंगे, असा टोलाही त्यांनी यावेळी भाजप-सेना सरकारला लगावला.

नागपुरात चव्हाणांवर शाईफेक

नागपूरमधील हसनबाग येथे आयोजित एका सभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर शाईफेक करण्यात आली. यावेळी शाई फेकणार्‍या इसमाला काँग्रेस कार्यकर्त्यांनी बेदम चोप दिला. मंचावर घुटमळत असलेल्या एका व्यक्तीने अचानक चव्हाण यांच्या अंगावर शाई फेकली. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्याला अडविले व मंचावरून खाली खेचत बेदम मारहाण केली. दरम्यान यावेळी एकही पोलीस याठिकाणी उपस्थित नव्हता असे सूत्रांनी सांगितले.