सैनिकांचे तरी चारित्र्य चिवडू नका!

0

राजकारणात आम्ही इतरांपेक्षा कसे वेगळे आहोत हे दाखवण्याच्या नादात भाजपचे चरित्र आणि चारित्र्य जणू हरवत चालले आहे, असे वाटण्यासारखे प्रसंग घडत आहेत. परवा सोलापूर जिल्ह्यात भाजपच्या एका प्रचार सभेत बोलताना आ. प्रशांत परिचारक यांनी जे अकलेचे तारे तोडले त्यावरून असे वाटते की, कुणी विकृत व्यक्तीच अशा पद्धतीने जाहीरसभेत बोलू शकतो. “तिकडं पंजाबमधला सैनिक.. तो असतो बॉर्डरवर.. अन् त्याची बायको इकडं बाळंतीण होती.. त्याला फोन येतो की तुझ्या बायकोला मुलगा झाला.. वर्षभर तो काय गावाकडं गेलेला नसतो.. तो तिथं पेढे वाटतो.. लोकं म्हणतात काय झालं काय झालं?? तो म्हणतो मला मुलगा झाला..” असे अतिशय चीड आणणारे आणि देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात सैनिकाच्या चारित्र्याची चिवडाचिवड करणारे वक्तव्य या महाशयांनी करून भाजप आणि त्या पक्षाचे नेते सैनिकांविषयी कोणता विचार करतात हे दाखवून दिले आहे.

एखादी अंगावर आलेली बाब झुरळाप्रमाणे झटकून टाकण्यात भाजपवाले अतिशय पटाईत असतात, या वक्तव्याशी आमचा संबंध नाही, त्यांचे व्यक्तिगत मत असू शकते वगैरे अशा नाटकबाज्या या प्रसंगातही ते करतील. परंतु, त्यामुळे गेलेली इज्जत परत येत नसते. शेवटी जे तुमच्या डोक्यात असते ते कधीतरी अशा ओकारीच्या माध्यमातून बाहेर पडते. प्रशांत परिचारक भाजपचे नाहीत अपक्ष आमदार आहेत, असाही युक्तिवाद पुढे येऊ शकतो. मात्र, सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून परिचारक भाजपच्या पाठिंब्यावर निवडून आले आणि आता जिल्हा परिषद निवडणुकात कुणाचा प्रचार करीत आहेत हे जनता ओळखून आहे. हेच वक्तव्य चुकून कुणा काँग्रेस किंवा राष्ट्रवादी नेत्याकडून झाले असते तर आतापर्यंत भाजपने सगळी माध्यमे वापरून त्यांच्या शंभर पिढ्यांचा उद्धार केला असता हे लक्षात घ्यायला हवे.

मुळात जिल्हा परिषद निवडणूक आणि सीमेवर तैनात सैनिक यांचा काय संबंध? सत्ताधारी हे बिरुद लागले की वाचाळवीरांचे पेवच फुटते. परंतु, कोणाबाबत काय बोलले पाहिजे याचे जिभेवर नियंत्रण नसले की असे घडते. फार पूर्वी मुंबईत आलेल्या परप्रांतीयांबाबत असे बोलले जायचे, त्याचा विकृत आनंदही घेतला जात होता. परंतु, आता थेट सैनिकाला लक्ष्य केले जाईल याचा कुणी स्वप्नातही विचार केला नसावा. जिथे जायला बुद्धिवंत दहादा विचार करतो तिथे मूर्ख एका मिनिटात जाऊन येतो असे म्हटले जाते ते परिचारक यांच्या बाबतीत तंतोतंत लागू होते. एकेकाळी कथित कारगिल युद्ध करून ‘जय जवान, जय किसान’ हा नारा देताना भाजपवाले आपणच जवानांचे तारणहार असल्याचा आव आणताना ज्या देशाने पाहिले, त्याच देशात सीमेवरील जवानांच्या चारित्र्याची लक्तरे वेशीवर टांगताना हाच पक्ष पुढाकार घेताना दिसेल, असे वाटले नव्हते.

शीर तळहाती घेऊन आणि डोळ्यात तेल घालून सीमेवर आपले जवान नक्कीच अशा फुकट चंबूसाठी आपले जीवन अर्पण करीत नाहीत हे कुणीतरी प्रशांत परिचारक नावाच्या या विकृत आमदारांना सांगायला हवे. महिला, तरुणी, इतर धर्मीय यांच्याबाबत भाजपचे केंद्रीय वाचाळवीर आजवर काय काय मुक्ताफळे उधळून गेलीत याची उजळणी केली तरी एखादा ग्रंथ होऊ शकेल त्यात आणखी एकाची भर पाडून परिचारक यांनी महाराष्ट्राच्या सभ्यतेवर लत्ताप्रहार केला आहे हे हा सुसंस्कृत महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही. जे पोटात असते ते कधीतरी ओठावर यायला वेळ लागत नाही, मला तसे म्हणायचे नव्हते अशी सारवासारव कदाचित पक्षाची चपराक बसल्यावर हे दिवटे आमदार करतीलही, पण तुम्ही कंबरेचे सोडून डोक्याला बांधायला एवढ्या लवकर उतावीळ व्हाल याची समाजाने कधी अपेक्षा केली नव्हती हे लक्षात घ्या.

एक परिचारक दीर्घकाळ पंढरीची सत्ता हातात ठेवून तीर्थकुंडात मुतणार्‍या बडव्यांना पाठीशी घालत होते, तर हे त्यांचेच पुतणे दुसरे परिचारक काकाच्याही एक पाऊल पुढे टाकत भारतीय सैनिकांचे चारित्र्य चिवडायला निघाले आहेत. यातून तुमचा एकूणच स्त्रियांच्या बाबतीतला दृष्टिकोन उघडा पडल्याशिवाय राहत नाही, शिव छत्रपतींचा आशीर्वाद, अशी हाकाटी पिटणारे भाजपवाले मुळात कसे सत्तेचे आणि बेताल वागण्याचे कसे पेंढारी आहेत हे या घटनेवरून महाराष्ट्राच्या लक्षात आले आहे. परिचारकसारखी कुलांगार कार्टी शिवरायांच्या पुतळ्याच्या मातीच्याही लायकीचे नसतात हे दिसून आले. स्त्री जगातली कोणतीही अन् कुणाचीही असो तिचा सन्मान कसा करावा एवढी जरी शिकवण शिवरायांच्या चरित्रातून पक्षाला घेता आली आणि अशा तोंडाळ नेत्यांच्या जिभेला बूच मारता आला तर बघा अन्यथा तुमचा कुणी वाली आहे, असे म्हणण्याचे धाडसही कुणी करणार नाही.

– पुरुषोत्तम आवारे पाटील
9892162248
(लेखक दैनिक जनशक्तिच्या मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक आहेत.)