सेल्समनच्या डोळ्यात मिरची पूड टाकून 55 हजारांची रक्कम लांबवली

यावल : शहरातील एका एजन्सीचे सेल्समन ग्रामीण भागातून पैसे वसुली करून शहरात येत असताना सातोद रस्त्यावर दोघा अज्ञात चोरट्यांनी डोळ्यात मिरची पावडर सेल्समनजवळील रोख रक्कमसह मोबाईल, सीमकार्ड मिळून 55 हजार 364 रुपयांची रक्कम बॅग घेत पळ काढला. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. यावल पोलिसात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

भर दिवसा लूट झाल्याने खळबळ
दहिगाव, ता.यावल येथील केशव रामदास पाटील (35) हे शहरातील सचिन एजन्सी येथे रीलायन्स जिवो सेल्समन म्हणून कामाला आहेत. मंगळवारी रीलायन्स जिवो कंपनीचे मोबाईल फोन, रीचार्चचे ग्रामीण भागातील पैसे गोळा करण्यास ते गेल्यानंतर दुपारी एक वाजता सातोदवरून दुचाकी (एम.एच.19 ए.एस. 2623) ने यावल शहरात येत असताना बांधेल नाल्याजवळ रस्त्याच्या कडेला एक ईसम काटेरी झुडूपे तोडून रस्त्यावरून नेत असताना पाटील यांनी दुचाकीचा वेग कमी केला असता त्याचवेळी पाठीमागून दुसरा इसम आला व त्याने केशव पाटील यांच्या डोळ्यात लाल मिरचीची भुकटी टाकली व त्यांच्या जवळील 52 हजार 364 रुपयांची रोकड तसेच तीन हजार रुपये किमंतीचे मोबाईल व सीम असलेली रेक्झीनची बॅग घेवून पळ काढला. काटेरी फांदी रस्त्यावर टाकणार्‍याच्या अंगात पांढर्‍या रंगाचा फुल बाहीचा शर्ट, पँन्ट तर डोळ्यात मिरची टाकणार्‍याने अंगात लालसर रंगाचा फुल बाहिचा शर्ट घातल्याचे पोलिसात नामूद आहे. दोघे संशयीत 30 ते 35 वयोगटातील होते. दोन अज्ञातांविरूध्द यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जितेंद्र खैरणार करीत आहेत.

Copy