सेनेचा दोस्ताना, भाजपचा महाजनी कावा

0

एकाने मिठी मारावी, दुसर्‍याने पाय ओढावे, हे तंत्र आता सगळ्यांच्याच लक्षात येऊ लागले आहे. शिवसेना प्रत्येक प्रश्‍नाला भिडू बघत असताना त्यांना त्रासात आणण्याची पद्धतशीर मोहीम भाजपमधील काही लोक चालवत आहेत. भाजपचा ऑक्टोपस वेगवेगळ्या शुंड हातांद्वारा शिवसेनेला घेऊन जनमानसात नाना विखार पेरून महाराष्ट्रात आपले एकट्याचेच बळ वाढवण्याच्या प्रयत्नात आहे.

भगव्यास करून नागवे । लोकापुढे नाचवावे ॥
कमल आपुले फुलवावे । चिखल त्यांचा बनवून ॥
महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षात भारतीय जनता पक्षाने, शिवसेनेने ज्या काही घडामोडी केल्या, त्या कार्यकर्ते म्हणवून घेणार्‍या भाजपेयी आणि शिवसैनिक या दोघांनाही रुचलेले नाही. आपण सत्ताकांक्षी आहोत हे दाखवण्यासाठी ज्या घडामोडी झाल्या. त्यामुळे या दोघांनाही मते देणारे नाराज झाले आहेत. भाजपची संस्कृती संपन्न राजकारणाची आणि शिवसेनेची संस्कृती संरक्षण वाटचालीची इतिश्री झाली आहे, असं म्हणण्यापर्यंत हे सारे घडले. जणू या दोघांनी मिलिंद सोमणी संस्कार स्वीकारल्याचे दर्शन मतदारांना घडले आहे.

भाजपने ज्याप्रकारे नरेंद्रशक्ती अंगात शिरल्यानंतर शिवसेनेशी दोस्ताना ठेवला याने त्यांचा महाजनी कावा नियतीने लोकांपुढे ठेवला. शिवसेनेला लाजिरवाण्या अवस्थेत लोटण्याचा, बदनाम करून लोकमानसातून उतरवण्याचा, शिवसेनेमुळे नको त्या तडजोडी करणे व्रतस्थ भाजपला भाग पडते आहे, असे भासवण्याचा पद्धतशीर प्रयत्न भाजपने चालवला आहे. भाजपेयी आपल्याच युती भागीदाराला उघडा पाडण्यासाठी कुठल्या थराला गेला, तर ही त्या प्रश्‍नाची प्रकृती नीती असे का मानू नये?

एकाने मिठी मारावी, दुसर्‍याने पाय ओढावे, दुसर्‍याने शिवसेनेला पालथे पाडण्यासाठी पाय ओढण्याचा प्रयत्न करायचा हे तंत्र आता सगळ्यांच्याच लक्षात येऊ लागले आहे. शिवसेना प्रत्येक प्रश्‍नाला भिडू बघत असताना त्यांना नानाप्रकारेे त्रासात आणण्याची, त्यासाठी खोट्या बातम्या पिकवण्याची पद्धतशीर मोहीमच भाजपमधील काही लोक चालवत आहेत. भाजपचा ऑक्टोपस वेगवेगळ्या शुंडहातांद्वारा शिवसेनेला घेऊन जनमानसात नाना विखार पेरून, शिवसैनिकांत नेत्यांबद्दल अनादर, संशय निर्माण व्हावा अशा घटना घडवून त्यावर प्रकाशझोत टाकून महाराष्ट्रात आपले एकट्याचेच बळ वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. शिवसेनेबरोबरची युती यापुढील काळात ठेवायची नाही असा निर्णय भाजपच्या वरिष्ठ पातळीवर झाला आहे. केंद्राची सत्ता हाती आली आहे. महाराष्ट्राच्या सारख्या महत्त्वाच्या राज्याची सत्ता आपल्या एकट्याकडे असावी, असं मानून भाजपने वाटचाल सुरू केली आहे.

मनोहर जोशी युतीचे मुख्यमंत्री असताना भाजपने असेच वर्तन केले होते. संजय दत्तला शिवसेनेमुळे सोडावे लागले. खैरनारला शिवसेनेमुळे नोकरीतून दूर ठेवावे लागले. परकीय भांडवल गुंतवणुकीला शिवसेनेमुळे मान्यता द्यावी लागली. बुडवलेला एन्रॉन शिवसेनेमुळेच पुन्हा कोकणच्या उरावर बसला. शिवसेनेशी युती असल्याने आपल्या अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना मानाची आणि मोलाची पदे देता आली नाहीत. शिवसेनेमुळे नको त्या प्रश्‍नावर नको तेवढी टोकाची भूमिका घ्यावी लागली. अशा नाना गोष्टी नाना मंडळींद्वारे मांडल्या गेल्या होत्या. भाजपशी आपला संबंध नाही असे दाखवत हे शिस्तीत केले जात होते. भाजपला हात झटकता यावेत आणि प्रसंगी अक्षरश: पलटी खाऊन एखाद्या प्रश्‍नावर भूमिका घेता यावी यासाठीच या वेगवेगळ्या रूपातल्या व्यक्ती, संघटना असतात. त्यावर भाजपचेच नेते नियंत्रण ठेवतात. मात्र, ते वेगळे आम्ही वेगळे हे तुणतुणे सतत वाजते ठेवण्याचे भान सुटणार नाही. याची काळजी घेऊन हे सर्व चालते. तडजोडीचे राजकारण कराल तर ही सत्ता आणि युती गेली उडत आम्ही विरोधी पक्षात बसू: पण दिलेला शब्द मोडणार नाही, असा निर्धार आगामी काळात दोन्ही पक्षांकडून दिसेल काय? स्वदेशी जागरण मंच, हा भाजपचाच आहे. भाजप-अभाविप, विश्‍व हिंदू परिषद समरसता मंच, वनवासी कल्याण, बजरंग दल या आणि अशा सगळ्यांचा रिमोट कंट्रोल कुणाच्या हातात आहे हे नरेंद्र्र मोदी, अमित शहा, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत सर्वांना हडसून, खडसून विचारायला हवे. लोकांना भोट बनवून साळसूदपणे हे असे दुसर्‍याला नागवे करण्याचे राजकारण भाजपने कशासाठी चालवले आहे? आपल्याच कर्तबगारीने आपलीच सत्ता कारकीर्द संपवण्याची घातकी कृती आवरण्याचे भान यातल्या अनेकांना उरलेले नाही हे दिसून येत आहे. आपले भंगणारे ऐक्य टिकवण्याची जबाबदारी थोरल्या भावाची आहे, हे विसरून कसे चालेल?

हिवाळी अधिवेशनातील कामकाज हे युतीतील समंजसपणाचे घोतक असल्याचे समजण्याचे काहीच कारण नाही. शिवसेनेनं कमीपणा, अपमान स्वीकारत भाजपची सत्ता टिकवण्यासाठी जे काही सोसले ते भाजपेयींनी ओळखले पाहिजे. शिवसेनेमुळेच सत्ता राबवता आली आणि येणार आहे. याची जाणीव जरी राखली तरी महाराष्ट्रावर उपकार होतील. जनतेने इथे पुन्हा काँग्रेसी राजवट नको म्हणूनच सेना-भाजपला सूत्रे दिली. पण बहुसंख्येने केलेली हुकूमशाही ती लोकशाही, असा परस्पर अर्थ लावून भाजपने जी वाटचाल केलीय ती सर्व समावेशक अशा लोकशाहीला अभिप्रेत नाही. पण एकचालकानुवर्तीत राजकारण करणार्‍यांना हे कोण समजावून सांगणार? आता आपल्या हाती नांदा सौख्य भरे, एवढेच म्हणणे राहिलं आहे.

प्रभंजन – हरीश केंची
9422310609