सूचनांचे तंतोतंत पालन आणि मेहनत हेच यशाचे गमक

0

बंगळूरू: ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे श्रेय मी घेत नाही. कारण जी काही कामगिरी केली आहे, ती त्यांच्या खेळाडूंनीच. मी फक्त माझ्याकडे असलेली मार्गदर्शनाची जबाबदारी माझ्या पद्धतीने पार पाडली व त्यांनी माझ्या सूचनांचे तंतोतंत पालन केले, असे ऑस्ट्रेलियाचे फिरकी सल्लागार श्रीधरन श्रीराम यांनी सांगितले. परदेशी प्रशिक्षकाने केलेल्या सूचना मनमोकळेपणाने स्वीकारण्याच्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंकडे असलेल्या वृत्तीमुळेच मी त्यांना योग्य रीतीने फिरकी गोलंदाजीचे धडे देऊ शकलो. हीच वृत्ती त्यांना विजयाकडे घेऊन गेली, असेही भारताचे श्रीराम यांनी सांगितले.

खेळाडू करतात मनमोकळेपणाने चर्चा
श्रीराम हे सध्या ऑस्ट्रेलियन संघासोबत फिरकी गोलंदाजीचे सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. भारताविरुद्ध येथे झालेल्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा शिल्पकार स्टीव्ह ओ’केफीला श्रीराम यांचे मार्गदर्शन लाभले आहे. ते पुढे म्हणाले, खरे तर मला अन्य प्रशिक्षकांइतका आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव नाही. मात्र माझ्याकडे असलेली शिकवणीची सर्व शिदोरी मी त्यांच्यासाठी खुली केली व त्यांनी ती मनापासून स्वीकारली हा त्यांचाच मोठेपणा आहे. कर्णधार स्टीव्ह स्मिथसह संघातील सर्वच खेळाडू माझ्याशी मनमोकळेपणाने चर्चा करतात. भरपूर शंकाही विचारतात व मी माझ्या परीने त्यांचे निरसन करतो. मी दिलेल्या सूचनांप्रमाणे त्यांनी सराव सत्रात गोलंदाजीचे वेगवेगळे प्रयोग करून पाहिले. ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांनी कधीही माझ्या कामात ढवळाढवळ केली नाही. किंबहुना त्यांनी मला पूर्ण स्वातंत्र्य दिले. फिरकी गोलंदाजी कशी करायची, याबरोबरच त्याला सामोरे कसे जायचे याबाबतही त्यांनी माझ्याकडून सल्ला घेतला, असेही श्रीराम यांनी सांगितले.