सुसाईड नोट लिहून खोटेनगरात 13 वर्षीय मुलीची आत्महत्या

0

जळगाव – गेल्या दोन वर्षापूर्वी पिंप्राळा हुडकोत खेळत असतांना चिमुकलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेत अल्पवयीन मुलांनी ही कृत्य केल्याचे निष्पन्न झाले होते. यातील एक अल्पवयीन मुलगी सुहानाबी शेख मुस्ताक (वय-13) रा. राज मालती नगर, दांडेकर नगर हीने खोटेनगर येथे आजीकडे वास्तव्यास असतांना वरच्या मजल्यातील खोलीत ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी समोर आली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान मुलीने मृत्यूपूर्वी वहीच्या पानावर तीन ओळींची हिंदी भाषेत चिठ्ठी लिहिली असून मी माझ्या इच्छेने आत्महत्या करत असून यास कुणालाही जबाबदार धरु नये असा चिठ्ठीचा आशय आहे.

सहा महिन्यांपासून आजीकडे राहत होती

पिंप्राळा हुडकोत चिमुकलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर सुहाना बी हिचे आई, वडील हे पिंप्राळा हुडको सोडून शहरात दुसरीकडे वास्तव्यास आहेत. सुहानाबी शेख मुस्ताक ही गेल्या सहा महिन्यांपासून आपल्या आजीकडे खोटे नगर येथे राहत आहे. 27 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घरातील सर्व सदस्य खालच्या घरात होते. यावेळी सुहाना हिने दुसर्‍या मजल्यातील खोलीत जावून दरवाजा आतून बंद करून घेतला. व ओढणीच्या मदतीने गळफास घेवून आत्महत्या केली. गेल्या काही दिवसांपासून आपल्या हातून मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या नैराश्यात सुहाणा होती. तसेच मानसिकरित्या आजारी असल्याचे नातेवाईकांकडून पोलिसांना सांगण्यात आले. नैराश्यातून तिने आत्महत्या केल्याची चर्चा आहे.

पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा

बराच वेळ झाल्यानंतर सुहाना खाली आली नसल्याने घरातील एकाने खोलीजवळ गेले. खोलीचा दरवाजा आतून बंद असल्यामुळे सुहानाला आवाज दिला. मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने खोलीचा मागचा दरवाजा तोडून पाहिले असता सुहानाने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे दिसून आले. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. तातडीने सुहानाच्या आईवडीलांशी संपर्क साधून घटनेची माहिती देण्यात आली. तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक कदीत तडवी, पोलीस हेड कॉन्स्टेबल विश्‍वनाथ गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचानामा केला. यावेळी सुहानाने मृत्यूपूर्वी लिहलेली चिठ्ठी पोलिसांना आढळून आली. हिंदी भाषेत तीन ओळीत असलेल्या या चिठ्ठीत माझ्या मृत्यूस कुणालाही जबाबदार धरु नये, मी माझ्या इच्छेने आत्महत्या करत असल्याचे नमूद असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Copy