सुरक्षा रक्षकांच्या कामबंदमुळे विद्यापीठ सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर

0

 

जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सुरक्षा रक्षकांचे गेल्या चार महिन्यापासून वेतन थकीत असून थकीत वेतनाच्या मागणीसाठी सुरक्षा रक्षक अनेक दिवसांपासून वारंवार विद्यापीठ प्रशासन आणि संबंधीत ठेकेदारांकडे खेटे घालीत आहे. परंतु अद्यापही सुरक्षा रक्षकांना थकीत वेतन मिळाला नसल्याने त्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात अस्थायी स्वरुपाचे 120 सुरक्षा रक्षक काम करीत आहे. विद्यापीठातील अंतर्गत सुरक्षेची संपुर्ण जबाबदारी त्यांच्यावर असून त्यांनी कामबंद आंदोलन पुकारल्याने विद्यापीठाचा अंतर्गत सुरक्षीततेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. गेल्या चार महिन्यापासून सुरक्षा रक्षकांना वेतन मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. एैन दिवाळीच्या काळात देखील सुरक्षा रक्षकांना वेतन दिले गेले नव्हते.

सुरक्षा रक्षकांच्या वेतनात मोठी तफावत
विद्यापीठात 120 सुरक्षा रक्षक असून गेल्या चार महिन्यापासून त्यांना वेतन मिळालेला नाही. संबंधीत ठेकेदारांमार्फत एक महिन्याचे वेतन दिले गेले आहे. मात्र वेतनाच्या रकमेत तफावत आढळून येत आहे. सर्व सुरक्षा रक्षकांचे चार दिवस सुटीचा कालावधी वगळता 26 दिवसाचे वेतन दिले आहे. सर्व सुरक्षा रक्षकांना समान वेतन असतांना काहींच्या खात्यात कमी रक्कम जमा करण्यात आले आहे तर काहींच्या खात्यात वेतनाची रक्कम आलेली नसल्याचे सुरक्षा रक्षकांनी म्हटले.

सुरक्षा रक्षकांना प्रशिक्षण नाही; मात्र दिले प्रमाणपत्र
सुरक्षा रक्षक कायद्यान्वये सुरक्षा रक्षक म्हणून काम करणार्‍यांना प्रशिक्षण पुर्ण करणे आवश्यक असते. विद्यापीठातील सुरक्षा रक्षकांना एक महिने प्रशिक्षण पुर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे. मात्र प्रत्यक्षात रक्षकांना प्रशिक्षणच दिले गेले नाही. तसेच ज्या काळातील प्रशिक्षण प्रमाणपत्र दिलेले आहे. त्याकाळात सुरक्षा रक्षकांचा ठेका दुसर्‍या कंपनीकडे होते. दरम्यान प्रत्येक सुरक्षा रक्षकांकडून प्रशिक्षण खर्च म्हणून 4500 रुपये घेण्यात आलेले आहे.

अद्याप सुरक्षा रक्षकांकडे ओळखपत्र नाही
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ही खुप मोठी संस्था असल्याने कर्मचार्‍यासहीत विद्यार्थ्याना ओळखपत्र दिलेले आहे. सुरक्षा रक्षक इतर व्यक्तींना ओळखपत्र दाखविल्याशिवाय विद्यापीठ परिसरात प्रवेश करुन देत नाही. मात्र सुरक्षा रक्षकांनाच ओळखपत्र दिलेले नाही. त्यामुळे अंतर्गत सुरक्षेचा काय? हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. तसेच सुरक्षा रक्षकांना टॉर्च, दंडे दिलेले नसल्याने सुरक्षा रक्षकांचाच सुरक्षेचा मोठा प्रश्‍न या ठिकाणी आहे.