सुरक्षा दलाच्या जवानांना दोन दहशतवादी ठार करण्यात यश

0

श्रीनगर-जम्मू- काश्मीरमधील बडगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात सैन्य दलाच्या जवानांना यश आले आहे. या चकमकीत सुरक्षा दलातील तीन जवान जखमी झाले आहेत.

बडगाममधील छत्तरगाम येथे दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांला मिळाली होती. सुरक्षा दलांनी सकाळी परिसरात शोधमोहीम राबवली असता एका घरात लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. यानंतर झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. तर सुरक्षा दलातील तीन जवानही यात जखमी झाले आहेत. परिसरात अजूनही शोधमोहीम सुरु आहे.

गेल्या आठवड्याभरात सुरक्षा दलांनी जम्मू- काश्मीरमध्ये ऑपरेशन ऑलआऊट राबवले असून यात २० हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. २० नोव्हेंबर रोजी शोपियाँ येथे ४, २३ नोव्हेंबर रोजी अनंतनाग येथे सहा, २५ नोव्हेंबरला शोपियाँ येथे सहा, पुलवामा येथे एक आणि २७ नोव्हेंबरला कुलगाममध्ये दोन आणि त्राल येथे एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला होता.