सुमितकुमार ठरला हिंदकेसरीचा मानकरी

0

पुणे । बहुचर्चित कुस्तीपटू अभिजीत कटकेचा दोन सरळ फेर्‍यांमध्ये पराभव करत रेल्वेचा खेळाडू असलेल्या सुमितकुमार याने यंदाच्या ’हिंदकेसरी’ किताबावर नाव कोरले. 85 किलो वजन गटातील हा सामना पुण्यातील सणस मैदानावर रंगला होता. या सामन्यात सुमितकुमारने अभिजीतला 7-2,9-2 अशा गुणांच्या आधारावर विजयश्री खेचून आणला. सुमीत हा दिल्लीच्या छत्रसाल कुस्ती आखाड्याचा पहिलवान आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने व भारतीय शैली कुस्ती महासंघ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त 50 व्या सुवर्ण महोत्सवी भारतीय शैली अजिंक्यपद व हिंद केसरी किताब कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सुमित कुमार याला अडीच लाख रुपयांचे जाहीर बक्षीस आणि चांदीची गदा देऊन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते गौरवण्यात आले. यावेळी दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष राजाश्रय यादव, सचिव बाळासाहेब लांडगे आदी उपस्थित होते. यावेळी झालेल्या अंतिम फेरीत सुरुवातीपासून सुमितकुमारने आघाडी घेतली. आश्चर्य म्हणजे याच मैदानावर झालेल्या सरळ उपांत्य फेरीतही सुमितकुमारने अभिजीतला धूळ चारली होती. तीच परंपरा राखत अंतिम फेरीतही त्याने अभिजीतलाच पराभूत करत जीत मिळवली. या लढतीत पहिल्या 7 मिनिटाच्या लढतीत अभिजीत 6-2 ने पिछाडीवर होता. यात पहिल्या मिनिटात सुमितने अभिजीतला आखाड्या बाहेर ढकलत 1 गुण मिळवला त्यानंतर, सुमीतने उत्कृष्ट डाव टाकत 2 गुणांची कमाई केली. त्यानंतर अभिजीतने चपळाई दाखवत 2 गुण मिळवले. परंतु सुमित ने पहिल्या डावात अभिजितला अतिरिक्त गुण मिळवायची संधी दिली नाही. खेळाच्या दुसर्‍या सत्रात सुमितने आक्रमक धोरणाचा अवलंब करीत सामान्यावरील आपली पकड आणखीन मजबूत करीत 9-2 ने हिंद केसरी ’किताब पटकाविला आणि अभिजीतला उप हिंद केसरी किताबवर समाधान मानावे लागले.

विविध गटातील अंतिम निकाल
51 किलो :- प्रथम :- अभिजीत पाटील ( महाराष्ट्र)
द्वितीय :- अमित (हरियाणा)
तृतीय :- विक्रम मोरे (महाराष्ट्र-ब), टी.किशन (तेलंगणा)

55 किलो :- प्रथम :-दीपक ( दिल्ली)

द्वितीय :- राहुल (एनसीआर)
तृतीय :- अंकित (केंद्रीय पोलीस दल), विराज चौधरी ( पंजाब-ब)

61 किलो :- प्रथम :- रविंदर (एनसीआर)
द्वितीय :- सुरज कोकाटे ( महाराष्ट्र)
तृतीय :- सौरभ पाटील (महाराष्ट्र-ब), राकेश ( रेल्वे-ब)

67 किलो:- प्रथम :- अक्षय हिरगुडे (महाराष्ट्र)
द्वितीय :- विकास (हरियाणा)
तृतीय :-प्रदीप (रेल्वे), अमित कुमार (छत्तीसगड)

75 किलो:- प्रथम:- विकास राणा (नौदल)
द्वितीय :- विकास (रेल्वे)
तृतीय :- जयभगवान (केंद्रीय पोलीस दल), मनोज कुमार (उत्तराखंड)

85 किलो :- प्रथम :-बलराज (दिल्ली)
द्वितीय :- संजय सूळ (महाराष्ट्र)
तृतीय :- संदीप बन (रेल्वे-अ), प्रदीप (बिहार)

100 किलो :- प्रथम :-नरेश (रेल्वे)
द्वितीय :- मोनू (एनसीआर)
तृतीय :- कपिल धामा ( दिल्ली-ब), संदीप काळे (महाराष्ट्र-अ)

हिंद केसरी गट
(85 ते 130) :- प्रथम :-सुमितकुमार (रेल्वे)
द्वितीय :-अभिजित कटके (महाराष्ट्र )
तृतीय :- जोगिंदर ( रेल्वे-ब), किशन कुमार (रेल्वे-अ)