Private Advt

सुप्रीम कंपनीतील कर्मचार्‍याचा मेहरुण तलावावर खून : दोघे आरोपी जाळ्यात

जळगाव : दारू पित असलेल्या तरूणांना हटकल्याच्या कारणावरून सुप्रीम कंपनीतील कर्मचारी व जळगावातील रहिवासी दिनेश भिकन पाटील (44, रा. रामेश्वर कॉलनी) यांचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. ही घटना शनिवार, 9 एप्रिल रोजी दुपारी उघडकीस आली होती. या गुन्ह्यातील दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्यातील एक अल्पवयीन असून दुसर्‍याचे नाव दुलेश्वर उर्फ आनंद सदाशीव माळी (21, रा.तांबापूरा) असे आहे.

किरकोळ कारणावरून गेले प्राण
दिनेश भिकन पाटील (44, रा.रामेश्वर कॉलनी) हे सुप्रीम कंपनीत नोकरीला होते तर रामेश्वर कॉलनीत पत्नी व मुलीसह वास्तव्यास होते. शनिवार , 9 एप्रिल रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास ते मेहरूण तलावाजवळील डॉ. राजेश जैन यांच्या फार्म हाऊसजवळ असलेल्या एका नाल्याजवळ ते दुचाकी (एमएच 19 बीएक्स 1497) ने आले आणि दारू पिण्यासाठी बसले. त्याच ठिकाणी बाजूला दुलेश्वर उर्फ आनंद सदाशिव माळी (21, तांबापूरा) आणि एक 15 वर्षीय अल्पयीन मुलगा देखील दारू पित बसले. त्यावर दिनेश पाटील यांनी एवढ्या लहान वयात दारू पिताय, तुम्ही उठा येथून असे हटकले. याचा राग आल्याने दोघांनी दगडाने ठेचून खून करून पळ काढला होता.

यांनी उघडकीस आणला गुन्हा
याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होात. गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल देवडे, सहाय्यक फौजदार अशोक महाजन, हवालदार विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, सुधाकर आंभोरे, अक्रम शेख, नाईक राहुल पाटील, विजय पाटील, प्रितम पाटील, भारत पाटील, विजय चौधरी, दर्शन ढाकणे यांनी गुन्ह उघडकीकस आणला. संशयीत आरोपी दुलेश्वर उर्फ आनंद सदाशीव माळी (21, रा. तांबापूरा) आणि एक 15 वर्षीय अल्पयीन मुलगा यांना तांबापूरा परीसरातून अटक केली आहे. आनंद माळी यास 20 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.