सुट्ट्यांनी झाली कोंडी

0

मुंबई: सध्या बहुतांश शाळांच्या परीक्षा संपल्या असून शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे समर व्हॅकेशनसाठी बर्‍याच जणांनी ‘लाँग टूर’चे ‘प्लनिंग’ केले आहे. त्यातच आजपासून सलग तीन दिवस सुट्ट्या आल्या आहेत. त्यामुळे मुंबई आणि परिसरातून आज सकाळीच वाहनांचा जथ्थ्या मुंबईबाहेर सुट्ट्या साजर्‍या करण्यासाठी निघाला आणि मुंबईच्या वेशीवर येऊन धडकला व तिथेच खोळंबला. पनवेल ही मुंबईची वेशी समजली जाते. कारण इथूनच मुंबई-गोवा आणि मुंबई-पुणे महामार्ग सुरू होतो. नेमके या दोन महामार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसले.

शनिवार, रविवार आणि सोमवार (महाराष्ट्र दिन) अशा सलग तीन दिवस सुट्ट्या आल्या आहेत. तसेच शाळांनाही सुट्या पडल्यामुळे अनेक कुटुंबांसाठी हा सुवर्ण योग आहे. म्हणून अनेकांनी लागलीच घर सोडून मुंबई बाहेर जाण्याचे बेत रचले. त्यानुसार शनिवारपासून मुंबईच्या वेशीवर असलेल्या मुंंबई-गोवा आणि मुंबई-पुणे या दोन महामार्गांवर मुंबई बाहेर जाणार्‍या वाहनांची संख्या वाढली होती. कोणत्याही परिस्थिती रविवारची सकाळची हवा ही मुंबईबाहेरचीच घ्यायची, असा मनोमन निर्धार करून निघालेल्यांचा चांगलाच हिरमोड झाला. कारण रविवारी सकाळी मुंबईतून बाहेर पडल्यानंतर इच्छित स्थळी पोहोचताना वाहतूक कोडींचा सामना करावा लागला आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. या भागात तब्बल पाच किलोमीटरहून अधिक वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे सुट्टी साजरी करायला निघालेल्या अनेकांच्या आनंदावर विरजण पडले आहे. सुट्टी असल्याने कोकण आणि गोव्याकडे निघालेल्या अनेकांनादेखील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे. मुंबई-गोवा महामार्गावर माणगावजवळ वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे.

सुट्टी असल्याने मुंबईबाहेर जात असलेल्या अनेकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो आहे. तर मुंबईत प्रवास करतानादेखील प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. मध्य रेल्वेचे रडगाणे सुरू असल्याने सुट्टीच्या दिवशी प्रवाशांचे हाल होत आहेत. कळव्याजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची जलद आणि धीम्या मार्गावरील वाहतूक खोळंबल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत.