सुखी जीवनशैलीसाठी निरामय आरोग्य गरजेचं : तनिषा मुखर्जी

0

पिंपळे गुरव : आनंदी व सुखी जीवनशैलीकरिता निरामय आरोग्य गरजेचे आहे. त्यासाठी नियमित व्यायाम व वेळोवेळी आरोग्य तपासणी केल्यास भविष्यात उद्भवणारे गंभीर आजार सहजपणे टाळता येतात, असे मत हिंदी चित्रपट अभिनेत्री तनिषा मुखर्जी हिने पिंपळे सौदागर येथे व्यक्त केले. शिवार गार्डन चौकातील अत्याधुनिक सबअर्बन डायग्नोस्टिक्स वैद्यकीय निदान केंद्राला तिने नुकतीच भेट दिली. त्यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना तिने आपले विचार मांडले. अभिनेत्री तनुजा यांची मुलगी व काजोल हिची धाकटी बहीण असलेल्या तनिषाने पॅथॉलॉजिस्ट डॉ. संजय अरोरा यांच्यासह पत्रकारांशी आरोग्याच्या संदर्भात सर्व बाजुंनी संवाद साधला.

आरोग्याबाबत जागरूक रहा
दैनंदिन धावपळीच्या जीवनात आपली नोकरी, कामधंदा करीत असताना प्रत्येकजण स्वत:च्या आरोग्याची हेळसांड करीत असतो. त्यातच महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा (ब्रेस्ट कॅन्सर) धोका अधिकच डोके वर काढत आहे. त्यामुळे याबाबतची जागरुकता करण्यासाठी अभिनेत्री मुखर्जी आली होती. यावेळी तिने लहानग्यांपासून मोठ्यांना आरोग्याचा कानमंत्र दिला. वयात येणार्‍या मुलींपासूनही स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण काहीअंशी दिसून येते. महिलांनी वयाच्या पस्तीशीनंतर याबाबत जागरूक राहून तज्ज्ञ डॉक्टरांकडून नियमित तपासणी करणे गरजेचे आहे, असे तनिषा म्हणाली.

मराठी लोकांचे भरभरून प्रेम मिळाले
महाराष्ट्राने व मराठी माणसांनी आमच्या कुटुंबावर भरभरून प्रेम केले, असे सांगून तनिषा मुखर्जीने तिची आई तनुजा, मावशी नूतन यांच्या आठवणींना उजाळा दिला. आम्ही महाराष्ट्राच्या प्रेमामुळे आम्ही कृतकृत्य झालो, असेही तिने सांगितले.