सीमेपलीकडून फुटीरतावादी नेत्यांकडे आले 70 लाख रुपये

0

जम्मू । जम्मू-काश्मीरमध्ये सतत सुरू असलेला हिंसाचार, तणाव आणि दगडफेकीच्या पार्श्‍वभूमीवर सिमेपलीकडून येणार्‍या पैशांचा उलगडा झाला आहे. काश्मीरमधील युवकांना भडकवण्यासाठी, त्यांच्याकडून घातपाती कारवाया करण्यासाठी प्रोत्साहित करणार्‍या फुटीरवादी नेते आणि संघटनांना पाकिस्तानच्या आयएसआयकडून आर्थिक रसद मिळत असल्याचा खुलासा एका वृत्तवाहिनीने केला आहे. या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार आयएसआयने फुटीरवाद्यांना सुमारे 70 लाख रुपये पाठवले आहेत. या संपूर्ण कटाचा म्होरक्या हुर्रियत नेता शबीर अहमद शाह आहे. आयएसआयने अहमद सागरच्या माध्यमातून हे पैसे पाठवले होते. सागरने हे पैसे शबीर शाहला पुरवले.

त्यामुळे पाकिस्तान केवळ सिमेपलीकडून दहशतवादाला खतपाणी घालत नसून भारतात आजादी आंदोलनाची सुरुवात करण्यासाठी आर्थिक मदत करतही आहे असे या वृत्तवाहिनीने म्हटले आहे. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होऊ नये म्हणून भडकाऊ वक्तव्ये आणि दहशतवाद वाढवण्यासाठी रावळपिंडीहून आयएसआयचे एजंट हुर्रियतच्या कार्यालयात पैसे पुरवत आहेत.

मागील काही दिवसांमध्ये भारतातही काही आयएसआयच्या हस्तकांना अटक करण्यात आली होती. या हस्तकांची कसून चौकशी केली जात आहे. भाजपचे वरिष्ठ नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी यांसदर्भात प्रतिक्रिया देताना तत्काळ राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. हिजबुलचा कमांडर बुरहान वाणीला भारतीय जवानांनी ठार मारल्यावर काश्मीरमध्ये हिंसाचार आणि तणाव निर्माण झाला होता. बुरहानचे समर्थक काश्मीर युवक रस्त्यावर उतरून भारतीय सुरक्षा दलांवर दगडफेक करत आहेत. या युवकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी बळाचाही वापर करण्यात आला आहे. बुरहान मारला गेल्यावर, 10 महिन्यानंतरही काश्मीरमधील हिंसाचार थांबलेला नाही. भारतीय जवान अतिरेक्यांशी दोन हात करत असताना अनेकवेळा काश्मीरमधील स्थानिक लोक जवानांवर दगडफेक करून दहशतवाद्यांचा बचाव करत आहेत.