सीमा भोळे यांचा महापौरपदाचा राजीनामा

0

भारती सोनवणेंची वर्णी लागण्याची शक्यता; महापौरनिवडीसाठी पाठविणार प्रस्ताव


जळगाव– भाजपने जळगाव महानगरपालिकेवर एकहाती सत्ता खेचून आणल्यानंतर सीमा भोळे यांनी महापौरपदाची संधी मिळाली होती.दरम्यान,पक्षाच्या ध्येय धोरणानुसार वर्षभराचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने त्यांनी मंगळवारी आयुक्त उदय टेकाळे यांच्याकडे महापौरपदाचा राजीनामा दिला असून आयुक्तांनी मंजूर केला आहे. त्यामुळे आगामी महापौरपदाच्या निवडीसाठी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.

जळगाव महापालिकेची 2018 च्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता आली. त्यानुसार चौदाव्या महापौर म्हणून सीमा भोळे विराजमान झाल्या होत्या. सकाळी साडेअकरा वाजता आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांच्या दालनात जावून त्यांनी महापौरपदाचा राजीनामा दिला.यावेळी स्थायी समिती सभापती अ‍ॅड.शुचिता हाडा,शोभा बारी,गायत्री राणे,कैलास सोनवणे,सदाशिव ढेकळे,विशाल त्रिपाटी,चेतन सनकत आदी उपस्थित होते.

महापौरपदासाठी भारती सोनवणे आघाडीवर

सीमा भोळे यांनी महापौरपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे महापौरपदासाठी अनेकांची पक्षश्रेष्ठींकडे मोर्चे बांधणी सुरु झाली असली तरी महापौरपदासाठी भारती सोनवणे यांचे नाव आघाडीवर असून त्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

मनपा कर्ज मुक्ती करू शकले – महापौर

भाजपच्या पक्षश्रेष्ठीनी 18 सप्टेंबर 2018 ला महापौरपदाची संधी दिली. त्यानुसार हुडकोच्या कर्जात अडकलेल्या महापालिकेला पक्षश्रेष्ठींच्या सहकार्यानेे कर्जमुक्त करु शकले. तसेच पिंप्राळा उड्डाणरपुल, शिवाजीनगर रेल्वेपुल, बिंबित गाळे प्रकरण, स्वच्छता, रस्ते आदी कामे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याचे सीमा भोळे यांनी सांगितले.