सीए, सीएस अभ्यासक्रमाच्या परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये

0

मुंबई – देशातील लॉकडाऊन दोन आठवड्यांनी वाढवण्यात आल्यामुळे सनदी लेखापाल आणि कंपनी सचिव या अभ्यासक्रमांच्या जूनमध्ये होणार्‍या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता या परीक्षा २९ जुलै ते १६ ऑगस्टदरम्यान होणार असून, त्याबाबतची घोषणा इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) आणि इन्स्टिटयूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने (आयसीएसआय) परिपत्रकाद्वारे केली आहे.

कोरोनामुळे देशात मार्चमध्ये लॉकडाऊन लागू झाल्यानंतर मेमध्ये होणार्‍या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करून १९ जून ते ४ जुलैदरम्यान परीक्षा होणार असल्याचे आयसीएआयकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र, आता केंद्र सरकारने लॉकडाऊनचा कालावधी दोन आठवडयांनी वाढवल्यानंतर परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. आता २९ जुलै ते १६ ऑगस्ट दरम्यान परीक्षा होणार असल्याचे आयसीएआयचे अतिरिक्त सचिव एस. के . गर्ग यांनी परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. परीक्षेची अधिक माहिती आयसीएसआयच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
तर कंपनी सचिव अभ्यासक्रमाची १ ते १० जूनदरम्यान होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून, आता त्या ६ जुलैपासून सुरू होणार असल्याचे आयसीएसआयने स्पष्ट केले आहे. तसेच पोस्ट मेंबर क्वालिफिकेशन (पीएमक्यू) परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

Copy