Private Advt

सीआरपीएफ जवानाला लुटले : चौघे दरोडेखोर जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात

भुसावळ/जळगाव : चाकूचा धाक दाखवत एरंडोलनजीक सीआरपीएफ जवानाला लुटण्यात आल्याची घटना 18 नोव्हेंबर 2021 रोजी एरंडोल शहरापुढील भालगाव फाट्याजवळ घडली होती. या प्रकरणी एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जळगाव गुन्हे शाखेने या दरोड्याच्या गुन्ह्याची उकल केली असून मालेगावातील चौघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

अशी घडली होती घटना
सीआरपीएफमध्ये कार्यरत जवान श्रीकांत शांताराम माळी (रा.सावित्रीनगर, पारोळा) हे सुटीवर घरी निघाल्यानंतर 18 नोव्हेंबर 2021 रोजी रात्री ते रेल्वेने जळगावात आले. त्यानंतर जळगावातील आकाशवाणी चौफुलीवर ते पारोळ्याला जाण्यासाठी थांबले. तेथून तवेरा वाहनाने ते मध्यरात्री पारोळ्याला जाण्यासाठी निघाले. एरंडोल शहराच्या पुढे भालगाव फाटा येथे चालकाने तवेरा गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. यानंतर चालकासह त्याच्या सोबतच्या संशयीतांनी माळी यांना चाकूचा धाक दाखवून साडेतीन हजार रुपये व तीन हजार रुपयांचा मोबाइल व बॅग हिसकावली. बॅगेत त्यांचा युनिफॉर्म, एटीएम कार्ड व महत्त्वाची कागदपत्रे होती. लुटीनंतर संशयीत पारोळ्याकडे पसार झाले. या संदर्भात जवान श्रीकांत माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एरंडोल पोलिस स्थानकात संशयीतांविरूध्द गुरनं.203/2021, भादंवि 394, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या आरोपींना केली अटक
जळगाव गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मालेगावातील चौघा दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. अटकेतील आरोपींमध्ये मनोज रमेश पगारे, आकाश राजेंद्र जगताप, प्रशांत अशोक वाघ, विशाल राजेश मोरे (सर्व रा.मालेगाव, जि.नाशिक) यांना अटक करण्यात आली. ही कारवाई जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अशरफ शेख, नाईक नंदलाल पाटील, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, भगवान पाटील, सचिन महाजन, चालक अशोक पाटील आदींच्या पथकाने केली.