सियावर प्रभू श्रीरामचंद्र की जय…!

0

धुळे / नंदुरबार। मंगलवाद्यांचा किनकिनाट, गुलालाची उधळण आणि सियावर रामचंद्र की जय, जयजय रधुवीर समर्थच्या गजरामध्ये हजारो भाविकांच्या उपस्थितीत राम जन्मला ग सखी राम जन्मलाचा नाद करत रामजन्माचा उत्सव साजरा करण्यात आला. हा शाही उत्सव पाहण्यासाठी प्रमुख अधिकार्‍यांसह यांनीही हजेरी लावली. तसेच ठिकठिकाणच्या राम मंदिरात दर्शनासाठी भाविकांची एकच गर्दी झाली होती. धुळे, नंदुरबार, शहादा, शिरपूर, साक्री, तळोदा, नवापूर, दोंडाईचा, शिंदखेडा, नरदाना, सोनगीर, फागणे, अक्कलकुवा आदींसह अनेक खेडेगावांमध्येही राम जन्माचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. अयोध्यापती मर्यादा पुरुषोत्तम सियावर रामचंद्र की जय…प्रभू श्रीराम की जय‘च्या गजरात दणाणून गेला. गुलालाची उधळण करत हजारो भाविकांनी प्रभू श्रीरामचंद्राचा जन्मोत्सव जल्लोषात साजरा केला. मंदिरामध्ये मंगळवारी पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यानिमित्ताने भजन, पूजन, कीर्तन, प्रवचन, महाप्रसाद आदी कार्यक्रम घेण्यात आले.

श्रीराम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम
धुळे । शहर व परिसरात प्रभु श्रीराम जन्म सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील विविध श्रीराम मंदिरे, भगवे झेंडे, पताका, फुले व विद्युत रोषणाई करून सजविण्यात आली होती. सर्वत्र भक्तीमय व मंगलमय वातावरण निर्मिती झाली होती. आग्रारोडवरिल श्रीराम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भजन, किर्तन व महाप्रसादाचे आयेाजन शहरातील मंदिरांमध्ये करण्यात आले. सकाळपासूनच श्रीराम मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. श्रीराम जन्मोत्सवानिमित्त मोटरसायकलरॅली जयश्रीराम जयश्रीरामचा जयघोष करीत युवकांनी भगवे टोपे व हातात भगवे ध्वज घेवून मोटरसायकल रॅली काढली. सकाळी 10 वा. श्रीराम प्रतिमेचे पुजन करून साक्री रोडवरून रॅलीला सुरूवात झाली. शहरातील प्रमुख रस्त्यावरून आग्रारोडवरील श्रीराम मंदिरावर पोहचल्यानंतर मोटरसायकल रॅलीचा समारोप करण्यात आला. साक्रीरोड वरील परिसरातील श्रीराम भक्तांनी या रॅलीचे आयोजन केले होते. या मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते.

नंदुरबारात ट्रॅक्टरवर शोभायात्रा
नंदुरबार । शहरासह परिसरात श्रीरामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरातून सजविलेल्या ट्रॅक्टरवर शोभायात्रा काढण्यात आली. ग्यारामीलच्या मैदानापासून शोभायात्रेला प्रारंभ करण्यात येवून त्याचा समारोप मोठा मारोती मंदिराजवळ करण्यात आला. या मिरवणुकीत भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विक्रांत मोरे, रवींद्र पवार, आनंदा माळी, पंडीत माळी, माणिक माळी यांच्यासह शेकडो हिंदू-बांधव सहभागी झाले होते. डिजेच्या तालावर नृत्य करीत अन जय श्रीरामच्या घोषधांनी शहर दुमदुमून निघाले होते. उड्डाणपूल, हाटदरवाजा, नगरपालिका, डॉ.अंधोर चौक मार्गे ही मोठी मारोती मंदिरावर पोहचली. या ठिकाणी देखील सामुदायीक हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले. बजरंग दल व विश्‍व हिंदू परिषदेच्या वतीने या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान श्रीरामनवमीचे औचित्य साधत नंदुरबार शहरातील हजारो तरूण काल सप्तश्रृंगी देवीच्या गडावर पदयात्रेने रवाना झाले. यावेळी डिजे लावून मिरवणूक काढण्यात आली होती. वेगवेगळ्या व्यायामशाळा, मंडळांचे तरूण देवीच्या दर्शनासाठी पायी निघाले होते.