सिमेंट बल्करच्या निखळलेल्या चाकाचा धक्का लागल्याने साकेगावच्या युवकाचा मृत्यू

भुसावळ : भुसावळकडून जळगावकडे जाणार्‍या भरधाव सिमेंट बल्करची मागील दोन चाके एक्समधून निखळली व महामार्गाजवळील चौधरी मोटर्सनजीक दुचाकीवर बसलेल्या तरुणाच्या अंगावर धडकल्याने त्याचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास साकेगावनजीक राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली. या अपघातात बादल गोकुळ पवार (17, रा.साकेगाव) या तरुण युवकाचा मृत्यू झाला. या घटनेने साकेगावकर शोककळा पसरली.

बल्करचे निखळले चाक
सूत्रांच्या माहितीनुसार, भुसावळकडून जळगावकडे सिमेंटचा ट्रक (एम.एच.15 एफ.व्ही.9994) जात असताना अचानक मागील दोन्ही चाके एक्सलमधून नि0खळली व एक चाक एका धाब्याजवळील नालीत पडले तर दुसरे चाक विरुद्ध दिशेने महामार्गावरील चौधरी मोटर्सजवळ दुचाकीवर बसलेल्या बादल पवार या तरुण युवकाच्या अंगावर आदळले. चाकाच्या वजनामुळे बादल सुमारे 30 फुटापर्यंत मागे फेकला जाऊन साईट पट्टीच्या दुभाजकावर आदळला व रक्तबंबाळ झाल्याने जागीच गतप्राण झाला. या घटनेनंतर साकेगावकरांनी बादलला गोदावरी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. मयत बादल हा पु.ओ.नाहाटा महाविद्यालयात अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत असल्याचे समजते. मयताच्या पश्चात, बहिण व आई-वडील असा परीवार आहे. अपघातानंतर बल्करवरील चालक व क्लिनर पसार झाले आहेत.