सिनेसृष्टीत चाललाय तरी काय?; पुन्हा एका अभिनेत्याची आत्महत्या

0

मुंबई: सध्या सिनेसृष्टीत प्रचंड नैराश्याचे वातावरण दिसून येत आहे. दिग्गज कलाकार आत्महत्येसारखे टोकांची पाऊले उचलत आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतनंतर मराठीतील कलावंत आशुतोष भाकरेने आत्महत्या केली. दरम्यान आता टीव्ही अभिनेता आणि मॉडेल समीर शर्मा याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. त्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. समीर शर्मा ४४ वर्षांचे होते. बुधवारी रात्री मुंबईतील मालाड येथील घरी समीरचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. समीरने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. ‘कहानी घर घर की’, ‘क्यों की सांस भी कभी बहू थी’, ‘इस प्यार को क्या नाम दूं-एक बार फिर’, ‘ज्योती’ अशा अनेक मालिकांमध्ये तो दिसला होता.

मलाड वेस्ट भागातील अहिंसा मार्गावरील नेहा सीएचएस बिल्डींगमध्ये समीर राहत होता. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात समीरने हे अपार्टमेंट भाड्याने घेतले होते. घरातून दुर्गंधी येत असल्याने सोसायटीतील लोकांना संशय आला. यानंतर या घटनेचा खुलासा झाला. समीरच्या मृतदेहाची अवस्था बघता समीरने दोन दिवसांपूर्वीच आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून देशातील वातावरण तापले आहे. काल सीबीआयकडे सुशांतसिंह आत्महत्येचा तपास सोपविण्यात आला आहे. सुशांतसिंहने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाली असावी असा संशय व्यक्त होतो आहे.