सिध्दीची जिद्दच वेगळी….

0

जळगाव – अनेकांना प्रेरणा देणारी, हारूनही जिंकणारी, हारलेल्या आणि हताश मनांना नवी उभारी देणारी सिद्धीची जिद्दच वेगळी ठरली. आज ही मुलगी आपल्यात नसली तरी हसत हसत कसं जगायचं हे शिकवून गेली आहे.

वर्षभरापासून हाडांच्या कॅन्सरशी लढा देत असलेल्या सिध्दी अनिल पाटील (१७) या अकरावीच्या विद्यार्थिनीची झुंज मंगळवारी सकाळी थांबली. सिध्दी हिला गेल्यावर्षी हाडांचा कर्करोग (कॅन्सर) असल्याचे निदान झाले होते. तेव्हापासून मुंबई, पुणे व जळगाव येथे तज्ज्ञ डॉक्टरांकडून तिच्यावर उपचार सुरू होते. एकीकडे कॅन्सरशी लढत असताना दुसरीकडे तिने रुग्णालयातून पेपरसाठी सुटी घेऊन दहावीची परीक्षा दिली. या परीक्षेत तिने अभूतपूर्व यश संपादन केले. या यशाने भारावून जात तिने मोठया जिद्दीने आजाराशी मुकाबला केला. अकरावीच्या वर्गात प्रवेश घेतल्यानंतर मात्र, हा आजार आणखीनच बळावला. तब्बल वर्षभरापासून सिध्दी या आजाराशी झुंज देत राहिली. शेवटी नियतीला वेगळेच मान्य होते. मंगळवारी तिने घरी अखेरचा श्वास घेतला. सिध्दी ही जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील कॉन्स्टेबल अनिल रावसाहेब पाटील (मूळ रा.बहादरपूर, ता.पारोळा) यांची कन्या होती. सायंकाळी तिच्यावर नेरी नाका वैकुंठधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सिध्दीच्या पश्चात वडील अनिल पाटील, आई योजना, भाऊ, बहिण व आजी असा परिवार आहे.

Copy