सिंधूची दुसर्‍या स्थानावर झेप

0

नवी दिल्ली । भारताची नवी फुलराणी म्हणून उदयास आलेली सिंधू नव-नवी शिखरे पादाक्रांत करत आहे. गुरुवारी जागतिक बॅडमिंटन असोशिएशनच्या रॅकिंगमध्ये रियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटाकावणार्‍या भारताच्या पी. व्ही. सिंधूने दुसरे स्थान पटकावले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या इंडिया ओपन चॅम्पियन स्पर्धेत पी. व्ही. सिंधूने स्पेनच्या कॅरोलिया मारिन हिचा 21-19, 21-16 अशा दोन सेटमध्ये पराभव करत जेतेपद मिळवले होते. या यशस्वी कामगिरीमुळे ती जागतिक रॅकिंगच्या दुस-या स्थानावर पोहचली आहे. पी. व्ही. सिंधूने जागतिक बॅडमिंटन रॅकिंगमध्ये दुसरे स्थान पटकवल्याची माहिती भारतीय बॅडमिंटन संघटनेने ट्विटरवरून दिली आहे.

अनेक स्पर्धांमध्ये जोरदार कामगिरी
सिंधूच्या या यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी सुद्धा पी.व्ही. सिंधूनचे ट्विटरवरुन अभिनंदन केले आहे. यावेळी ते म्हणाले की, खेळांसाठी आज मोठा दिवस आहे. पी. व्ही. सिंधू आपल्या करियरच्या सर्वश्रेष्ठ जागतिक रँकिंगच्या दुस-या स्थानावर पोहचली आहे. मलेशिया ओपनमध्ये पी. व्ही. सिंधूला पहिल्या फेरीतच पराभवाचा पत्करावा लागला होता. मात्र, आज जागतिक बॅडमिंटन रॅकिंगमध्ये दुसरे स्थान पटकवल्यामुळे तिच्यासाठी आणि भारतीय बॅडमिंटनसाठी ही खुशखबर आहे. ऑलिम्पिकनंतरही अनेक स्पर्धांमध्ये तिने जोरदार कामगिरी करत लक्ष वेधले होते.

मलेशिया ओपनमध्ये पहिल्याच फेरीत
सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू या भारताच्या ऑलिम्पिक पदकविजेत्या बॅडमिंटनपटूंना मलेशिया खुली सुपर सीरिज बॅडमिंटन स्पध्रेच्या पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला. दोन अव्वल खेळाडूंच्या पराभवाने बॅडमिंटन क्षेत्राला धक्काच बसला आहे. सिंधूने गेल्या आठवडयात ऑलिम्पिक सुवर्ण पदकविजेत्या कॅरोलिन मारिनला नमवून इंडियन खुल्या सुपर सीरिज स्पध्रेचे जेतेपद पटकावले होते. त्यामुळे मलेशियातही तिच्याकडून उल्लेखनीय कामगिरीची अपेक्षा होती. परंतु चीनच्या बिगरमानांकित चेन युफेई हिने रिओ ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेत्या सिंधूवर 18-21, 21-19, 21-17 असा सनसनाटी विजय मिळवला. अटीतटीच्या लढतीत चिनी खेळाडूने एक तास व आठ मिनिटांत सहाव्या मानांकित सिंधूवर मात केली. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायनाला जपानच्या अ‍ॅकेन यामागुचीने पराभूत केले. चौथ्या मानांकित जपानच्या खेळाडूने 19-21, 21-13, 21-15 अशा फरकाने अवघ्या 56 मिनिटांत बाजी मारली.

सायना दुखापतीने त्रस्त
भारताची फुलराणी अशी ओळख असलेल्या साईना नेहवालने 2015 मध्ये क्रमवारीत अव्वल स्थान मिळविले होते. मात्र, सध्या ती दुखापतीने त्रस्त असून, तिच्या क्रमवारीवरही परिणाम झालेला आहे. रिओ ऑलिंपिक स्पर्धेत सिंधूला रौप्य पदक मिळाले होते. त्यानंतर तिच्या कामगिरीत खूप सुधारणा झाली असून, तिने नुकतेच इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेचेही विजेतेपद मिळविले होते. रिओ ऑलिंपिकमध्ये तिला पराभूत करणार्‍या कॅरोलिन मरीनचा पराभव तिने केला होता. मात्र, मलेशिया ओपन स्पर्धेत तिला पहिल्याच फेरीतून बाहेर व्हावे लागले होते. या मोसमातील कामगिरीच्या आधारावर सिंधूने जागतिक क्रमवारीत दुसरे स्थान मिळविले आहे.