साहित्य हे सामाजिक बदलासाठी प्रभावी हत्यार

0

जळगाव । लेखनीने मने जिंकता येतात, युध्दे नाहीत आणि युध्दाने जग जिंकता येते, माणसे नाहीत. साहित्य हे सामाजिक बदलासाठी प्रभावी हत्यार आहे. अनेक राजवटी उलथून टाकण्यात आणि मानवतेचा लढा जिंकण्यात महत्त्वाची कामगिरी लेखनीच्या हत्यारांनी बजावली असल्याचा साक्ष इतिहास आहे असा सुर विवेकानंद प्रतिष्ठान जळगाव आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने बालसाहित्यीकांसाठी आयोजित उत्तर महाराष्ट्र स्तरीय कुमार साहित्य संमेलनात उमटला. समाजाचे मनोरंजन करणारी साहित्यकृती विपूल प्रमाणात आहे. त्यातून आनंद, उत्साह मिळत असतो. मात्र जेवढी आज समाजाला मनोरंजन पुर्ण साहित्याची गरज आहे. तेवढीच गरज समाजात असणार्‍या वाईट प्रवृत्तींना आळा बसण्यासाठीचे साहित्य कृती निर्माण करण्याची असल्याचे मत कुमार साहित्य संमेनलनाचे अध्यक्ष गिरीश पाटील यांनी व्यक्त केले.

मान्यवरांची उपस्थिती
विवेकानंद प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील सागरपार्क वर उत्तर महाराष्ट्र स्तरीय कुमार साहित्य संमेनलाचे आयोजन मंगळवारी करण्यात आले. या संमेनलाच्या उद्घाटनप्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन ब.गो.शानभाग विद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रा.गौरव महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वागताध्यक्षा मृणाल सहजे या उपस्थित होत्या. तसेच केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य अनिल राव, विवेकानंद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शोभा पाटील, सचिव धनंजय जकातदार, उच्चशिक्षण सहसंचालक डॉ.केशव तुपे, चंद्रकांत भंडारी, अशोक कोतवाल, राजेंद्र नन्नवरे आदी उपस्थित होते.

बालसाहित्यिकांच्या लेखणी उद्याचा भारत घडणार
आपल्या अध्यक्षीय भाषणात पुढे बोलताना गिरीश पाटील म्हणाले की, सगळीकडे सामाजिक स्वास्थ दुषित होत असताना, बाल साहित्यिकांनी समाज प्रबोधन पर साहित्य निर्माण करण्याची गरज आहे. या साहित्य संमेलनामुळे स्पर्धेच्या आणि धकाधकीच्या जीवनात बालमनाला एक नवीन उभारी मिळेल. त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळेल, असे गिरीश पाटील म्हणाले. बालसाहित्यिकांची लेखणी उद्याचा भारत घडवेल, अशा संमेलनामुळे बाल साहित्यिकांना हक्कांचा व्यासपीठ मिळेल. इंटरनेटच्या युगात साहित्य दूर जावू नये असे दर्जेदार साहित्य निर्माण करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

बालसाहित्यिकांवर संस्कृती सांभाळण्याची गरज
नववर्षाच्या पुर्वंसंध्येला भारतातील महत्वाचे शहर समजल्या जाणार्‍या बंगळुरु मध्ये संस्कृतीला काळीमा फासणारा प्रकार घडला. माहिती तंत्रज्ञान व सोशल नेटवर्किंगच्या युगात आपण संस्कृतीला मागे सोडून येत आहोत. त्यामुळे संस्कृती सांभाळण्याची गरज बालसाहित्यिकांवरच असल्याचेही गिरीश पाटील म्हणाले. संमेलनाचे उद्घाटक गौरव महाजन म्हणाले की, विद्यार्थ्यांना लहाणपणापासूनच वाचनाची आवड होईल, असे साहित्य त्यांना वाचायला दिले गेले पाहिजे. कारण वाचनाने विचार निर्माण होतात, चांगल्या विचारांनी चांगला समाज निर्माण होत असतो. विद्यार्थ्यांनी आपले मत मांडणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी स्वागताध्यक्षा मृणाल सहजे यांनी प्रास्ताविक करत संमेलनाची रुपरेषा मांडली.