साहित्य संमेलनात दुसर्‍या दिवशी भरगच्च मेजवानी

0

मी भरकटत साहित्याकडे गेलो – नारळीकर
मी विज्ञानाच्या क्षेत्रातून आडमार्गाने भरकटत साहित्याकडे गेलो आणि म्हणून आज मी इथं आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध शास्त्रज्ञ व विज्ञान कथाकार जयंत नारळीकर यांनी केले. डोंबिवली येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनातील श. ना. नवरे सभागृहात आयोजित संत्कार समारंभानंतर बोलत होते. संमेलन महामंडळातर्फे मुखपृष्ठकार बाळ ठाकूर यांचा व शास्त्रज्ञ नारळीकर यांचा सत्कार करण्यात आला. बाळ ठाकूर यांचा सत्कार श्रीपाद जोशी यांच्या हस्ते झाला. नारळीकर यांच्या सुविद्य पत्नी व प्रसिद्ध गणिततज्ञ मंगला नारळीकर यांच्यासह जयंत नारळीकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मनोगत व्यक्त करताना नारळीकर यांनी केंब्रिज विद्यापीठातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले गणित विषयाची परीक्षा होती. थॉमस आणि पार्किंगसन हे दोन हुशार विद्यार्थी होते. या परीक्षेत या दोघांपैकी पहिला कोण येणार? हे पाहणं औत्सुक्याचं होतं. परीक्षेनंतर पेपर तपासणीस यातील पार्किंगसनला बोलावून विचारतो. हा अवघड प्रश्‍न तू कसा सोडवलास? त्यावर पार्किंगसन सांगतो की, मी अभ्यास करताना अवांतर वाचनही करतो. एका नियतकालीकेत हा प्रश्‍न सोडवण्यात आला होता. त्यावरून मी हा प्रश्‍न सोडवला. नंतर थॉमसला बोलण्यात येतं. तू हा प्रश्‍न कसा लिहिलास, असे विचारल्यावर थॉमस सांगतो की, त्या नियतकालीकेत जो निबंध लिहिला होता, तो मिच लिहिला होता आणि या निबंधात हा प्रश्‍न मी सोडवला आहे. पुढे हाच विद्यार्थी लॉर्ड केल्वीन म्हणून पुढं आला. दरम्यान, नारळीकर यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल बोलताना श्रीपाद जोशी म्हणाले की, नारळीकर यांनी मराठी भाषेचं ज्ञान विज्ञान कथेतून समृद्ध केलं. मुखपृष्ठकार बाळ ठाकूर यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले, की ठाकरे यांनी प्रकाशन विश्‍वातला चेहरा, प्रकाशन व्यवहाराला सौंदर्यदृष्टी दिली. मुखपृष्ठकार रेषांमधून, बिंदूंमधून व्यक्त होत असतो, असे ते म्हणाले.

डोंबिवलीला साजेस व स्मार्ट संमेलन करुन दाखवले : गुलाब वझे
श्रुती देशपांडे । सांस्कृतिक नगरी म्हणुन डोंबिवलीची ख्याती आहे. त्यातच यंदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरणार आहे..येथील आगरी युथ फोरमला संमेलनाचे यजमानपद मिळाले आणि आम्ही करुन दाखवले असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजक आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी जनशक्तीशी बोलताना सांगितले.डोंबिवलीला साजेसे असे आणि स्मार्ट असे संमेलनच साहित्य संमेलनाचे आयोजन करावे असे का आणि कधी वाटले यावर बोलताना ते म्हणाले की,आगरी युथ फोरमच्या वतीने गेली बारा वर्षे आगरी महोत्सव भरविला जात आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून आगरीसमाजामध्ये विविध विषयांवर चर्चासत्र घेऊन सामाजिक प्रबोधन करण्याचे काम आम्ही करत आहोत. या महोत्सवात अनेकदिग्गज मान्यवरांनी हजेरी लावून त्यांचे विचार मांडले आहेत. साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, मंगेश पाडगांवकर, शं.ना.नवरे,बाबासाहेब पुरंदरे, बाबा आमटे, मंदाताई आमटे आदी सर्वाच्या व्याख्यानाने आम्ही प्रेरित झालो होतो.. त्यातच 9व्या आगरीमहोत्सवामध्ये विश्वास पाटील यांची मुलाखत होती. यावेळी येथील शिस्तबद्धता, व्यवस्था आणि कार्यक्रमाची रूपरेषा पाहूनतुम्ही साहित्य संमेलन का घेत नाही असे त्यांनी विचारले, तेव्हा पहिल्यांदा डोक्यात साहित्य संमेलन भरवावे, हा विचार मनातआला. या आयोजनाबददल लोकांचा प्रतिसाद कसा काय यावर सांगताना ते बोलले की, अतिशय नीटनेटक शिस्तबध्द आणि भपकेबाजपणा न दाखवता साधेपणा आणि आकर्षक अशी मांडणी करण्यात आली असल्याच्या लोकांच्या प्रतिक्रिया येत असल्याचे ते म्हणाले. तर नोटबंदी आणि आचारसंहिता यावर मात करुन आमचं हे संमेलन यशस्वीतेच्या वाटचालीवर आहे. आमदार निधी हा आचारसंहितेच्या कचाटयात सापडला आहे. मात्र तोही नक्कीच मिळेल असेही ते म्हणाले. हा कार्यक्रम आयोजित करताना मला आगरी महोत्सवाच्या आयोजनाच्या अनुभवाचा फायदा झाल्याचेही वझे म्हणाले.

क्रेझ वाटावी, असे बालसाहित्य निर्माण व्हावे
बालसाहित्य परिसवादातील माझा हा तिसर्‍या संमेलनाचा अनुभव आहे. मला असे वाटते की, बालकांना वर्षातून एकदाच मिळणारे हे लसीकरण फारसे प्रभाव पाडू शकत नाही, किंवा एका दिवसाच्या उपदेशाने मुलांमध्ये वाचनाची गोडी वाढते असे नाही. रोजच्या अनुभवातून, शिक्षणातून त्यांना मराठी भाषेची क्रेझ वाटली पाहिजे. त्यांना थ्रील वाटावे असे सुटसुटित साहित्य मराठीत उपलब्द करून दिले पाहिजे. मराठी भाषेन आता त्या युवा फॉर्ममध्ये जाण्याची गरज आहे. असे केले तरच जबरदस्तीने न येता युवा वर्ग, शाळा कॉलेजचे विद्यार्थी स्वत:हून संमेलनाला उपस्थित राहतील, असे मला वाटते. साहित्यासारखा प्रभावशाली जागर असू शकत नाही, हे अव्याहतपणे सुरू राहिले पाहिजे.
– डॉ.सलिल कुलकर्णी, संगितकार, गायक, बालसाहित्यकार

भाषा संवर्धन नीधीतला गोलमाल कधी थांबणार?
योगिनी बाबर । गत पाच वर्षांहूनही अधिक काळ मराठी भाषा संवर्धन आणि स्थानिक भाषा, बोली भाषा यांच्या सर्वदूर प्रजाराकरिता दिलेल्या निधीचा अपव्यय होत असल्याचा सूर यंदाच्या साहित्य संमेलनात पुन्हा एकदा उमटलेला दिसून आला. मराठी भाषा संवर्धनाकरिता देण्यात आलेल्या शासकीय नीधीतला गोलमाल कधी थांबणार, असा सवाल आता सामान्य भाषा प्रेमींकडून उपस्थित केला जात आहे. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर बोलल्या जाणार्‍या मराठी भाषेच्या संवर्धनाकरिता शासकीय निधीची तरतूद करण्याबरोबरच खासगी पातळीवरही भाषा संवर्धनाकरिता काही उपाययोजनांमध्ये सातत्य ठेवण्याकरिता मराठी साहित्य परिषदेची स्थापना 1906 पासुन महाराष्ट्रात सुरू करण्यात आली. या संस्थेला महाराष्ट्र शासनाकडून विविध उपक्रम राबविण्याकरिता अनेकप्रकारच्या अनुदानाच्या माध्यमातून लाखो रूपयांचा नीधी वर्ग केला जातो. हा निधी वर्ग करताना तो या संस्थेकडे न देता राज्यातील विद्यापीठांना या प्रक्रियेत सामावून घेत याविषयी काम करण्याचे आवाहन दिले जाते. निवडण्यात आलेल्या विद्यापीठांनी त्या त्या परिसरांतील स्थानिक भाषा, बोली भाषा, काळाच्या आड चालेली, काही प्रमाणात अस्तंगत होणारी पारंपरिक भाषा संवर्धनाकरिता काय उपाययोजना करता येतील, याचा आढावा घेण्याचे आणि भाषेची वृद्धी करण्याबाबत वाढ करण्याचे उपाय योजना केल्या जातात, मात्र गत काही वर्षात याबाबतचे काम नेमकेपणाने हात नसल्याचा वा अशा प्रकारचा निधी त्या त्या कारणाकरिता वापरात येत नसल्याचा आरोप वारंवार केला जात आहे, त्यातच आता डॉ. अक्षयकुमार काळे यांनी गत पाच वर्षातल्या या नीधीचे काय झाले? किती विद्यापीठांना कीती अनुदान मिळाले? या अनुदानाइतपत काम झाले का? आणि जर काम झाले नसेल तर ते अनुदान परत करा, अशी मागणी, चौकशी करण्याचे काम हाती घेण्याचे सूतोवाच दै.जनशक्तिशी बोलताना डॉ. काळे यांनी केले आहे.